*वनविभागात सेवा देणे हे ईश्वरीय कार्य – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार* *वन अकादमी येथे वन अधिका-यांच्या प्रशिक्षणाचा समारोप*

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर, दि. 13 ऑक्टोबर : परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता आहे. या सृष्टीत प्रत्येक घटकाचे अनन्यसाधारण महत्व आहे. जल, जंगल, जमीन, वन्यजीव आदींची सेवा आपल्या हातून घडते, ही वन कर्मचा-यांसाठी अभिमानास्पद बाब आहे. एक प्रकारे वनविभागात सेवा देणे हे ईश्वरीय कार्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वन अकादमी येथे भारतीय वन सेवेच्या अधिका-यांची तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर वन अकादमीचे संचालक एम.एस.रेड्डी, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर आदी उपस्थित होते.

कन्याकुमारी ते काश्मिर आणि कामरूख ते कच्छपर्यंत पसरलेल्या देशातील भारतीय वनसेवेचे अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित आहेत, राज्याचा वनमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो, असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, तीन दिवसात येथे विविध विषयांवर चिंतन, मंथन आणि चर्चा झाली असेल. या कार्यशाळेचा उपयोग आपापल्या राज्यात वन विभागाची सेवा देतांना अधिका-यांनी करावा. देशात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2014 मध्ये वाघांची संख्या 190 होती, तर ती आता जवळपास 312 च्या वर गेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 193 सभासद देशांपैकी 14 देशात वाघ आहेत. मात्र जगातील सर्वाधिक वाघ माझ्या क्षेत्रात आहे, याचा मला अभिमान आहे.

मानव – वन्यजीव संघर्षाबाबत सामूहिक चिंतनाची गरज आहे. भारतात प्रत्येक देवी-देवतांसोबत एक वन्यप्राणी आहे. म्हणजेच वन्यजीव हे देवाचे रूप आहे, याची जाणीव ठेवून काम करा. केवळ आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वनविभागाची नोकरी नाही. तर देवाने निर्माण केलेल्या सृष्टीचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमाविलेल्या कुटुंबासाठी 20 लक्ष रुपयांची तरतूद वनमंत्री म्हणून आपण जाहीर केली आहे. तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनजन योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तेंदुपत्ता बोनसचे 72 कोटी रुपये वनविभागाने दिले आहे. जेव्हा वन्यप्राण्यांकडून शेतक-यांच्या शेतमालाचे नुकसान होते, तेव्हा मनापासून वाईट वाटते. यावर तोडगा काढण्यासाठी आपले प्रयत्न आहे.

पुढे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, देशाचे पंतप्रधान जंगल आणि पर्यावरणाबाबत अतिशय संवेदनशील आहेत. भारतात 70 वर्षात लुप्त झालेले चिते पंतप्रधानांच्या पुढाकाराने नुकतेच आणण्यात आले आहे. वन्यप्राण्यांचे कॉरीडोर तयार करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. विशेष म्हणजे जंगलाचे संरक्षण करणा-या गावक-यांच्यासोबत वन विभागाने उभे राहावे. गावक-यांच्या मनात वन्यप्राण्यांबाबत जी भीती आहे, ती कमी करण्याचा प्रयत्न करा. येथे आलेल्या अधिका-यांनी आपापल्या राज्यात चांगले काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तत्पुर्वी भारतीय वन्यजीव संरक्षण संस्था आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे आणि मासिकाचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. वन अकादमी येथे देशभरातील भारतीय वन सेवेच्या अधिका-यांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात गुजरात, कर्नाटक, ओरीसा, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, केरळ, राज्यस्थान, उत्तराखंड बिहार आदी 13 राज्यातील अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी यांनी तर संचालन अतिरिक्त संचालक (प्रशिक्षण) पियुषा जगताप यांनी केले. कार्यक्रमाला ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक श्वेता बोडू, अपर संचालक (मुख्यालय) प्रशांत खाडे, अपर संचालक (प्रशासन) अविनाश कुमार आदी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *