फैजपुरात फुलणार साहित्यिकांचा मळा… *********************** *१७ जानेवारीला तिसरे लेवा गणबोली साहित्य संमेलन* तयारी अंतिम टप्प्यात

 

लोकदर्शन कल्याण.-👉गुरुनाथ तिरपणकर

तिसरे लेवागणबोली साहित्य संमेलन मंगळवार दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या प्रांगणात होणार आहे ,हे संमेलन लेवा गणबोली साहित्य मंडळ जळगाव व मधुस्नेह संस्था परिवार यांनी संयुक्तपणे आयोजित केले आहे.
संमेलन फैजपूर येथे होत आहे याला खूप महत्त्व प्राप्त होणार आहे. फैजपूरची भूमी थोर राष्ट्रपुरुष व स्वातंत्र्यसैनिकांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे तर या भूमीत कवी केशवसुत, बा. सी.मर्ढेकर, श्रीराम अत्तरदे, कवी भानू चौधरी, डॉ.श.रा.राणे यांचे या भूमीत वास्तव्य होते. १७ जानेवारी रोजी कवयित्री कुसुमताई चौधरी यांची ८२ वी जयंती सुद्धाआहे. त्यामुळे साहित्य संमेलन स्थळाला *कवयित्री कुसुमताई चौधरी साहित्यनगरी* असे नाव देण्यात आले आहे.संमेलनाध्यक्ष पदावर जळगाव येथील लेवा गणबोली लेखन करणारे श्री.अरविंद कृष्णा नारखेडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी लेवा गणबोलीत कथा,नाट्यछटा असे विपुल लेखन केलेले आहे; ते भादली हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत.
संमेलनाचा प्रारंभ साहित्यिक व कवी प्राध्यापक भानू चौधरी यांच्या निवासस्थानापासून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर उद्घाटन सत्र होईल.उद्घाटन परतवाडा कॉलेजचे प्राचार्य व भाषा शास्त्राचे अभ्यासक डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांच्या शुभहस्ते होणार आहे. संमेलनाचे मुख्य आयोजक मंडळाचे सचिव तुषार वाघुळदे तर कार्याध्यक्ष प्रभात चौधरी असून लेवा गणबोलीचे मानबिंदू इतिहासकार, जेष्ठ भाषातज्ञ डॉ.नि.रा.पाटील हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक रत्नाकर चौधरी, समाजसेवक व उद्योगपती सुबोधकुमार चौधरी, प्राचार्य प्रमोद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अजय बढे , आदी असणार आहेत.
संमेलनात तीन चर्चासत्र ,म्हणजे ( चावयाचावय ),प्रकट मुलाखत, नाट्यछटा सादरीकरण व लेवा गणबोलीतील तसेच मराठी कवी संमेलन होणार आहे.
संमेलनाचे बहुतांशी काम लेवा गणबोलीतच व्हावे असा आमचा प्रयत्न असणार आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रभात चौधरी, प्राचार्य प्रमोद चौधरी, आयोजक तुषार वाघुळदे, आयोजन समिती सदस्य किशोरी वाघुळदे, संजय पाटील , लिलाधर कोल्हे,ज्योती राणे सुवर्णलता पाटील (डोंबिवली ) तसेच फैजपूर कॉलेजचे प्राध्यापक व कार्यकर्ते कार्यरत आहेत.
संमेलनासाठी लेवा गणबोलीत लेखन करणारे साहित्यिक प्राध्यापक कवी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या बोलीत विविध क्षेत्रात कार्यरत व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही व्यक्तिमत्त्वांचा विशेष गौरवही या संमेलनात होईल.
लेवा गणबोली जळगाव जिल्ह्यात व बुलडाणा जिल्ह्यात बोलली जाते. निसर्गकन्या बहिणाबाई, कवी भानू चौधरी,रुक्मिणीबाई पाटील मलकापूर, द्वारकाबाई चौधरी पाडळसे, श्रीराम अत्तरदे ,तो.ना.चोपडे,डॉ.श. रा. राणे,डॉ.भालचंद्र नेमाडे,दिवाकर चौधरी,डॉ.नी. रा. पाटील भा.लो.चौधरी, राम नेमाडे,भास्कर महाजन, पद्मावती जावळे अशा अनेक लेखकांनी ही भाषा समृद्ध केली आहे. आजही नवीन पिढीतील अनेक लोक लेवा गणबोलीत लेखन करीत आहेत. बोलीभाषांचे संरक्षण जतन व संवर्धन होणे अतिशय महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात बोलीभाषा लुप्त होत चालल्या आहेत.त्या टिकाव्यात यासाठी अशा साहित्य संमेलनाची गरज आहे .पहिली दोन संमेलने जळगाव येथे अनुक्रमे भाषाप्रभू राम नेमाडे व लेवागणबोली शब्दकोषकार डॉ. नि. रा. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहेत.
लेवा गणबोली ही गोड व लहेजायुक्त भाषा आहे. बहिणाबाईच्या कवितांमुळे ती भारताच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार गेली आहे. मधुस्नेह परिवार नेहमीच सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात सहभागी होतो.
या संमेलनात साहित्यिक मंडळींसाह साहित्य प्रेमी,अभ्यासक आदींनी सहभागी व्हावे असे आवाहन करीत आहोत..लेवा गणबोली साहित्य संमेलन सर्वांसाठी खुले असणार असल्याचे मंडळाचे सचिव व आयोजक तुषार वाघुळदे ,स्वागताध्यक्ष आ.शिरीषदादा चौधरी आणि पदाधिकाऱ्यांमी केले आहे..

 

◆शिरीष मधुकरराव चौधरी
स्वागताध्यक्ष
◆तुषार वाघुळदे
आयोजक
◆ प्रभात चौधरी
कार्याध्यक्ष

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *