गांधीवाद हा आजच्या तरुणाईला सत्य, अहिंसा आणि शांतीच्या दिशेला घेऊन जाणारा प्रभावी मार्ग आहे.-* *डॉ. श्रीकांत पानघाटे*

 

लोकदर्शन👉 प्रा. गजानन राऊत

जिवती- ‘प्रत्येक महान पुरुष हा आपल्या काळाचे अपत्य असतात म्हणून त्यांचे ऐतिहासिक परीक्षण करतांना तत्कालीन कालखंडाचा विचार करूनच आजरोजी निरीक्षणे नोंदवणे अगत्याची असतात. वर्तमान काळाचे निकष लावून महात्मा गांधींना अभ्यासण्या ऐवजी, गांधी जो कालखंड जगले त्या काळाचा विचार डोळ्यासमोर ठेऊन, वर्तमानकालीन परिप्रेक्ष्यात गांधींना आजच्या तरुणाईने अभ्यासले आणि समजून घेतले तर तरुणांच्या हाती लागणारा गांधी हा काळाच्या सीमारेषा ओलांडून तरुणाईला प्रकाशमान वाट दाखवण्याचे सामर्थ्य अंगभूत राखून असलेला ऐतिहासिक महापुरुष असेल. पूर्वग्रहदूषित मानसिकतेने आणि पक्षपाती भूमिकेने महात्मा गांधीचा शोध घेतला तर आपल्या हाती लागणारा गांधी हा अस्सल आणि खरा असूच शकत नाही. परंतु वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष होऊन इतिहाससापेक्षी भूमिका घेऊन गांधीचा शोध घेतला तर तरुणाईला बोध देणारा गांधी नक्कीच सापडेल. म्हणून आजच्या तरुणाईला गांधी समजून घेण्याच्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेत सहभाग नोंदविताना फार परिश्रम घ्यावे लागेल.’ असे मत गांधीजयंतीचे औचित्य साधून, विदर्भ महाविद्यालय, जिवती मधील सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ” गांधीवाद आणि आजचा तरुण” या विषयावरील भाषण स्पर्धेचे मुख्य परीक्षक आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी व्यक्त केले.
‘इंग्रजांनी आपल्या देशावर लादलेल्या गुलामगीरीच्या जोखडातून मुक्त करून, भारतीयांना स्वातंत्र्याची पहाट दाखवण्यासाठी महात्मा गांधींनी केलेली कामगिरी ही आधुनिक भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवल्या गेली आहेच. परंतु गांधी नुसते आचार करून थांबले नाही तर त्यांनी अनेक विषयांवर अनेकर्थाने विचार अभिव्यक करून तत्कालीन समाजाला वळण देण्याचा प्रयत्न केल्याचे असंख्य दाखले इतिहास देतो. या साऱ्यांचा साक्षेपी विचार करता, गांधीवाद हा आजच्या तरुणाईला सत्य, अहिंसा आणि शांतीच्या दिशेला घेऊन जाणारा प्रभावी मार्ग आहे.’ असेही ते पुढे म्हणाले.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव थाटामाटात साजरा होत असताना, गांधी जयंतीचे औचित्य साधून गांधीवाद विद्यार्थ्यांना समजून घेता यावा आणि समजावूनही सांगता यावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या सदर भाषण स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ‘गांधीवाद आणि आजचे तरुण’ या विषयाला अनुसरून आपआपली भिन्नभिन्न मते व्यक्त करून गांधीवादाचा उलगडा नव्या अर्थाने आजच्या तरुण पिढीच्या अनुषंगाने केला.
या भाषण स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक साईराम जाधव याने पटकावला तर कु. मैमुन शेख हिने द्वितीय क्रमांक आणि कु. प्रीती चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळविला. सहभागी आणि प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस.एच. शाक्य यांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमाचे अध्यक्षपद प्रा. गुणवंत मस्कले यांनी भूषविले. या स्पर्धेचे नियोजन प्रा. गजानन राऊत यांनी केले तर आयोजन आणि संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. गंगाधर लांडगे आणि रासेयो समन्वयक प्रा. एस. बी. देशमुख यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळींनी परिश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *