By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
काँग्रेसच्या शिष्टमंडळाला संचालकांचे आश्वासन
नागपूर : व्हीएनआयटी संस्थेत सध्या सुरू असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीमध्ये अनुसूचित जाती, जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य देऊन रोस्टरनुसारच भरती केली जाईल, असे आश्वासन व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रबोध पडोळे यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.
व्हीएनआयटी संस्थेत कुठलीही जाहिरात व प्रक्रियेविना सहाय्यक प्राध्यापकांची भरती केली जात असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेश लाडे व नागपूर शहर जिल्हाध्यक्ष रुपराज गौरी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या शिष्टमंडळाने संचालकांची भेट घेतली.
कुठल्याही नियमांचे पालन न करता सुरू असलेली ही भरती प्रक्रिया ताबडतोब थांबवून अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य देण्याची मागणी शिष्टमंडळाने संचालकांकडे केली.
४२ आरक्षित पदांवर इतर वर्गातील उमेदवारांची भरती केली जात असल्याची बाब शिष्टमंडळाने संचालकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर संचालकांनी आरक्षित जागेवर अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारांना संधी देऊन रोस्टरनुसारच भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
या शिष्टमंडळात अश्विनी खोब्रागडे, नरेंद्र धनविजय, साहेबराव शिरसाट, भाऊराव मेश्राम, नरेश खडसे, गौतम अंबादे, विकास पटेल, अभिजीत सांगोळे आदींचा समावेश होता.