अनधिकृत बॅनर हटविण्याची प्रवाशांची मागणी.
लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 19 मे उरण तालुक्यात अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनर बाजी सुरु आहे. विविध शैक्षणिक संस्था, इतर उद्योग संस्था या आपल्या जाहिराती करण्यासाठी आपले बॅनर परवानगी न घेता कुठेही लावत आहेत. ज्या ठिकाणी परवानगी नाही अशा ठिकाणीही अनधिकृत बॅनर मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत. अश्या बॅनर मुळे एखाद्याचा अपघात होऊ शकतो किंवा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. मात्र या घटनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
उरण तालुक्यातील उरण पनवेल मुख्य रस्त्यावर फुंडे बस स्टॉप येथे रस्त्यावरून लोखंडी पाईप लाईन गेली आहे. या लोखंडी पाईप लाईन खालून सर्व वाहने ये जा करीत असतात. या ठिकाणी अनेक बॅनर लावलेले दिसतात.उरण मधील द्रोणागिरी नोड येथे राहणारे अतुल शेलार यांच्या अंगावर हे बॅनर पडणार होते अचानक त्यांनी आपले बाईक वेगाने चालवून आपला जीव वाचवीला. नाहीतर बॅनर अंगावर पडून त्यांचा अपघात निश्चित होता. वाहन चालवीताना वाहन चालक सरळ पुढे बघून वाहन चालवीत असतात. डोक्याच्या वरती असलेल्या पुलाकडे कोणीही लक्ष देत नाही.अचानक वरून पडणारे लाकडी बॅनर एखाद्याचे जीव घेऊ शकते. अधून मधून वादळवारा सुटत असतो त्यामुळे अपघात होण्याचा जास्त धोका संभवतो. त्यामुळे त्या अगोदरच काळजी घेतलेली बरे या उद्देशाने अनधिकृत बॅनर हटवून टाकावे. परवानगी असलेल्या ठिकाणीच बॅनर लावावेत अशी मागणी उरण द्रोणागिरी येथील रहिवाशी अतुल शेलार यांनी केली आहे.