१५ ते २२ मे या कालावधीत सोमनाथ येथे ” श्रमसंस्कार छावणी “* *देशभरातून ४०० हून अधिक युवक – युवती सहभागी होणार

*
*लोकदर्शन* 👉*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा*: – कोव्हीड – १९ च्या संक्रमणानंतर दोन वर्षांनी बाबा आमटे प्रणित ५३ वी आंतर भारती, श्रम संस्कार छावणी १५ ते २२ मे २०२२ दरम्यान महारोगी सेवा समिती, वरोरा अंतर्गत सोमनाथ प्रकल्पात आयोजित करण्यात आली असून या छावणीसाठी देशभरातून १५ ते ७९ वयोगटातील ४०० हून अधिक शिबिरार्थी सहभागी होणार आहे. शिबिराचे उद्घाटन रविवार, १५ मे ला महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांचे हस्ते होणार आहे. तसेच आनंदवनातील जेष्ठ कार्यकर्ते ‘ग्रामीण व शहरी भागातील शाश्वत विकास ‘ या विषयावर शिबिरार्थींशी संवाद साधतील.
सामाजिक जीवन जगताना मातीशी नाळ जुळली पाहिजे. समाजाने ज्यांना नाकारले अशा कुष्ठबांधवांना सोबतीला घेवून सात दशकांपूर्वी बाबा आमटे यांनी निर्जन माळरानात नंदनवन फुलवले. म.गांधी यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव असलेल्या बाबांनीही सतत श्रमाचा पुरस्कार केला. स्वयंपूर्ण खेड्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी हातभार लावावा, असे बाबा आमटे यांना मनापासून वाटत होते. त्यासाठी युवकांना मार्गदर्शनाची, प्रेरणेची गरज लक्षात घेता १९६७ मध्ये ‘ मे ‘ महिन्याच्या रणरणत्या उन्हात १५ ते २२ या कालावधीत युवकांसाठी सोमनाथ प्रकल्पात ” श्रमसंस्कार छावणी ” भरविण्यात आली. या प्रयोगाची यशस्वीता लक्षात घेता दरवर्षी सोमनाथ येथे छावणी भरविण्यात आली. या छावणीतून देशभरातील सुमारे ४० हजार युवकांनी प्रेरणा घेवून समाजात परत जावून विधायक कार्याला सुरुवात केली आहे.
आज जाती – धर्म, परंपरा, संस्कृती याच्या नावाखाली देशात रणकंदन माजवले जात आहे. दुभंगलेली मने जोडण्याचे दुष्टिकोनातून १९८६ मध्ये भारताच्या काण्याकोपऱ्यातून युवा महिला – पुरुष एकत्र येवून बाबांच्या नेतृत्वात ‘भारत जोडो’ यात्रा काढली. चार दशकानंतर ‘ आंतर भारती – भारत जोडो ‘ या संकल्पनेवर आधारित ही ‘ श्रम संस्कार छावणी ‘ सोमनाथ येथे भरवून सर्वधर्म समभावनेने देशभरातील युवकांना पुन्हा एकत्र बांधण्याचा प्रयत्न छावणीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
‘ श्रम ही है श्रीराम हमारा ‘ हे ब्रीद घेऊन सुरू झालेली छावणी नंतर ज्याने ज्याने अनुभवली तो पर्यटक बनून आला आणि परिवर्तक म्हणून गेला. चंद्रपुरातील ४८ अंश सेल्सिअसच्या रणरणत्या उन्हात युवकांना श्रमाचे मोल, घामांच्या धारांचा सुगंध याची जाणीव करून देणारी संकल्पना आहे. यंत्र युगातही मानवी श्रम, प्रयत्नच माणसाचे जीवन सुंदर बनवू शकतील या गांधीजींच्या विचारांचा वारसा बाबांनी कायम पुढे चालविला. शिक्षण, आरोग्य, जीवनोन्नती, कृषि, ग्रामीण विकास, ऊर्जा, पर्यावरण, जनजागृती आदी कित्येक समाज परिवर्तनाला कारणीभूत अशा चळवळीची पायाभरणी छावणीत झाली. देशातील युवक वाम मार्गाने भरकटत चालला आहे . तेव्हा अशा तरुणाईला आज श्रमसंस्कार छावणीची कधी नव्हे इतकी गरज आहे.
महाराष्ट्रातील १० सामाजिक कार्यकर्त्या पैकी ४ कार्यकर्ते याच श्रमसंस्कार छावणीतून प्रेरित झालेले असतात. आजच्या घडीला महाराष्ट्रातीलच काय तर भारतातील मोठा युवक महोत्सव म्हणून ही छावणी गणली जाते. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्याव्यतिरिक्त ओडिसा, गुजरात, येथील ही युवक युवती सहभागी होणार आहेत. सदर छावणीचे नियोजन कौस्तुभ आमटे व पल्लवी आमटे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. सदर शिबिरात महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे (लातूर ), केतकी घाटे, अमिता देशपांडे, अंशू गुप्ता ( गुंज)., दिल्ली, मंदार भारदे (नाशिक), युवकांशी संवाद साधतील तर भारत जोडोचे सहयात्री युवकांना भारत जोडो यात्रेतील अनुभव कथन करणार, असे शिबिर समन्वयक रवींद्र नलगिंटवार यांनी कळविले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *