राजकारणातील महिलांना आत्मसन्मान मिळण्याची गरज

By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
युवक काँग्रेसच्या शिबिरात महिला पदाधिकाऱ्यांचा सूर

नागपूर दि. १० मे २०२२

राजकारणात सर्वसामान्य घरातील महिलांचा प्रवेश होण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळण्याची गरज असून महिलांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने नागपूर जिल्ह्याच्या पेंच सिल्लारी येथे “लक्ष्य २०२२” हे निवासी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आपले अनुभव मांडले.
राजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाते. त्यामुळे आम्हाला कुठेतरी अपमानास्पद वाटत असल्याची व्यथा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी मांडली. महिलांना बचतगट अथवा इतर सरकारी योजनांचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारणातील महिलांना सरकारी अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. अपमानजनक वागणूक मिळत असल्याची खंत काँग्रेसच्या महासचिव नेहा निकोसे यांनी व्यक्त केली. महिलांना कमी लेखू नका, असे आवाहन रामटेक येथील सरपंच असलेल्या पदाधिकारी महिलेने केली.
काँग्रेस पक्षाने राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस दीपाली ससाणे यांनी केली. निवडणुकीत आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या पत्नींना तिकीट देण्याऐवजी सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना संधी देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महिला कुठल्याही समस्यांना तोंड देण्यास सक्षम आहेत. आम्हाला केवळ आत्मसन्मान मिळाला पाहिजे, असे मत कल्याणी रांगोळे, वैष्णवी किराड, प्रियंका सानप या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here