विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तीव्र उष्णतने होरपळला; विदर्भात उष्ण लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’🌧️🌦️

 

लोकदर्शन 👉: मोहन भारती

दिनांक : 30-Apr-22
पुणे : सूर्य आग ओकत असल्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अक्षरश: होरपळून निघाला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. ३०) विदर्भात तीव्र उष्ण लाटेचा (ऑरेंज अलर्ट), जळगावमध्ये उष्ण लाटेचा (यलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे, उर्वरित राज्यांत उन्हाचा ताप वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्ण लाट आली आहे. चंद्रपूर येथे शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्याचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४५.८ अंश सेल्सिअस तापमाने नोंदले गेले. तर जळगाव, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा येथे ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत उष्ण लाट आली. तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याने नगर येथेही उष्ण लाट होती.
यवतमाळ, धुळे, अमरावती, नागपूर या ठिकाणीदेखील उन्हाची ताप असह्य झाली आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज राज्यात कमाल तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमानातही वाढ झाली असून, दिवस रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली आहे.
मध्य प्रदेशपासून, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. ३०) राज्यात उष्ण व मुख्यतः कोरड्या हवामान अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ ४ मे रोजी चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहे. ५ मेपर्यंत या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत त्याची तीव्रता वाढत जाण्याचे संकेत आहेत.
🟡शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४१.८, नगर ४४.५, धुळे ४४.६, जळगाव ४५.६, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्‍वर ३३, मालेगाव ४३.२, नाशिक ४१, निफाड ४२, सांगली ३९.३, सातारा ४१.२, सोलापूर ४३.४, सांताक्रूझ ३७, डहाणू ३६.७, रत्नागिरी ३४.५, औरंगाबाद ४२.४, नांदेड ४२.८, परभणी ४३.८, अकोला ४५.४, अमरावती ४४.४, बुलडाणा ४२.३, ब्रह्मपुरी ४५.२, चंद्रपूर ४५.८, गोंदिया ४३.५, नागपूर ४४.३, वर्धा ४५.१, वाशीम ४३, यवतमाळ ४४.७
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here