वाचन संस्‍कृतीचा विस्‍तार व स्‍पर्धा परिक्षांमधील विद्यार्थ्‍यांचे यश यासाठी परिश्रम घेणार – आ. सुधीर मुनगंटीवार


लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन*

वाचाल तर वाचाल या उक्‍तीनुसार सर्वसामान्‍यांमध्‍ये ग्रंथ चळवळीचे तसेच वाचनाचे महत्‍व रूजावे यासाठी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाच्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर जिल्‍हयात विविध उपक्रम राबविणा-या माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूरातील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयात आज प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन करण्‍यात आले. स्‍पर्धा परिक्षांच्‍या माध्‍यमातुन चंद्रपूर जिल्‍हयातील विद्यार्थी प्राविण्‍यप्राप्‍त ठरावे यादृष्‍टीने त्‍यांना योग्‍य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे यासाठी या पुढील काळातही विविध उपक्रम राबविण्‍यात येतील. तसेच वाचन संस्‍कृतीचे महत्‍व अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचावे तसेच स्‍पर्धा परिक्षांमधील विद्यार्थ्‍यांचे यश यासाठी आम्‍ही सतत उपक्रमशील राहू, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी चंद्रपूरातील हॉस्‍पीटल वार्ड परिसरातील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयात प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी संस्‍थेचे सचिव अनिल बोरगमवार, सहसचिव राजेश सुरावार, कोषाध्‍यक्ष राजीव गोलीवार, प्रकाश धारणे, भाजपा नेते प्रमोद कडू, महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, आर्कीटेक्‍ट किशोर चिद्दरवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, १९९९ मध्‍ये चंद्रपूरात डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचा शुभारंभ आम्‍ही केला. शहरातील चौका चौकात मोफत वृत्‍तपत्र वाचनालये आम्‍ही सुरू केली. हळुहळु वाचनालयातील ग्रंथसंपदा वाढत गेली. हे वाचनालय राज्‍यातील प्रमुख उत्‍कृष्‍ट वाचनालयांपैकी एक ठरले याचा अभिमानाने उल्‍लेख करावासा वाटतो. त्‍यानंतर या वाचनालयात सामाजिक अर्थसहाय्याच्‍या योजना व विविध शासकीय योजनांसाठी माहिती व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्‍यात आले. स्‍पर्धा परिक्षांच्‍या तयारीसाठी अभ्‍यासिका कार्यान्‍वीत करण्‍यात आली. त्‍यानंतर या वाचनालयाचा विस्‍तार बल्‍लारपूर शहरात करण्‍यात आला. बल्‍लारपूरात वाचनालयाची अद्ययावत इमारत उभी केली. मुल शहरात सुध्‍दा वाचनालय सुरू करण्‍यात आले. पोंभुर्णा येथे सुध्‍दा वाचनालयाची इमारत बांधण्‍यात आली. सर्व वाचनालये सोलार करण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे. आजही अनेक विद्यार्थी येवून प्रत्‍यक्ष भेटतात व मी शासकीय सेवेत लागलो असे सांगतात तेव्‍हा मनाला जे समाधान लाभते ते मोठे असते. या संपूर्ण प्रक्रियेत सामाजिक दायित्‍व निधीच्‍या माध्‍यमातुन अनेक संस्‍थांनी मदत केली त्‍यांचेही आपण मनापासून आभार व्‍यक्‍त करतो असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. या प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रात विविध विषयांवर प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्‍यात येईल. मोटीव्‍हेशनल व्‍हीडीओ दाखविण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येईल, डिजीटल लायब्ररीची संकल्‍पना अधिक विस्‍तृत करण्‍यात येईल असेही ते म्‍हणाले.

यावेळी प्रास्‍ताविक सचिव अनिल बोरगमवार यांनी केले. यावेळी रविंद्र गुरनुले, डॉ. दीपक भट्टाचार्य, सचिन कोतपल्‍लीवार, रूद्रनारायण तिवारी, ज्‍योती जुमडे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here