खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती धोरणाबाबत बैठक संपन्न.

मोहन भारती
दिनांक : 05-Mar-21
मुंबई, दि. 4 : सेंद्रिय शेतीविषयक धोरणासंदर्भात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ मिळावी म्हणून जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या तयार करणे व त्यांचा जैविक शेती महासंघ तयार करणे या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व बँकाकडून सहकार्य मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे श्री.पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सहभागी होवून सेंद्रिय शेतीच्या पद्धती, उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन, बाजारपेठेशी संलग्न व्यवस्था निर्मिती, प्रमाणिकरण, या व इतर आवश्यक बाबी आत्मसात करून घ्याव्यात. त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विकेल ते पिकेल या धोरणानुसार शासन प्रोत्साहन देत असल्याचे कृषिमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मार्केट लिंकेज महत्त्वाचे असून त्यासाठी योग्य पद्धतीने प्रमाणीकरण होणे आवश्यक असल्याचे सुचविले. उत्पादित मालाच्या प्रमाणिकरणासाठी यंत्रणा निर्माण करावी. शेतकऱ्यांना प्रशिक्षण हे कोणत्याही नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अविभाज्य अंग आहे. दर्जेदार प्रशिक्षण व त्यातील सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले.
आंब्यांची वाहतूक आणि विक्री याबाबतही सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. श्री.सामंत यांनी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा निर्यात आणि विक्री याविषयी विविध सूचना मांडल्या. शासनस्तरावर याविषयी धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धिरज कुमार यांच्यासह राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, सेंद्रिय शेती करणारे राज्यातील विविध भागातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *