वर्ष २०३० पर्यंत बर्‍याच शहरांतील पाणीच संपणार.

पाण्याचा एकेक थेंब वाचवणे आवश्यक ! – नीती आयोगाचा अहवाल

5/ 3 /2021 मोहन भारती
देशासमोर गंभीर जलसंकट
देशाच्या बर्‍याच शहरांमध्ये जलसंकटाने गंभीर रूप धारण केले आहे. भविष्यात याची तीव्रता आणखी वाढणार, हे निश्‍चित आहे. नीती आयोगाच्या एका अहवालानुसार वर्ष २०३० पर्यंत बर्‍याच शहरांतील पाणी जवळजवळ संपलेले असेल. या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका देहली, बेंगळूरू, चेन्नई आणि भाग्यनगर (हैद्राबाद) या शहरांना बसणार आहे. वर्ष २०२० पासूनच पाणीटंचाईची समस्या चालू होणार आहे. काही काळानंतर देशातील १० कोटी लोक जलसंकटाने त्रस्त असतील.

वर्ष २०३० पर्यंत देशातील जवळजवळ ४० टक्के लोकांना पिण्याचे पाणी मिळणे अशक्य होईल. चेन्नईमध्ये आगामी काळात ३ नद्या, ४ तलाव, ५ झरे आदी पूर्णपणे सुकलेले असतील. तसेच इतर ठिकाणीही अशीच परिस्थिती उद्भवणार आहे, असे या अहवालात म्हटले आहे. अशा प्रकारचा अहवाल प्रसिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ३ वर्षांपूर्वी नीती आयोगाने आपल्या एका अहवालात सांगितले होते की, देशात जलसंरक्षणाविषयी अधिकतर राज्यांचे प्रयत्न समाधानकारक नाहीत.

छत्तीसगड, राजस्थान, गोवा, केरळ, ओडिशा, बिहार, उत्तरप्रदेश, हरियाणा, झारखंड, सिक्कीम, आसाम, नागालॅण्ड, उत्तराखंड आणि मेघालय या राज्यांचे जलसंरक्षणाविषयीचे अहवाल अगदीच असमाधानकारक आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अल्प पावसाची नोंद झाली आहे, तर काही राज्यांमध्ये दुष्काळ पडला आहे. यामुळे जमिनीतील पाण्याचा स्तर सतत खाली जात आहे. जलसंकटावर मात करण्यासाठी नीती आयोगाने देशातील अर्ध्या म्हणजेच जवळजवळ ४५० नद्यांना एकमेकांशी जोडण्याविषयीचा एक व्यापक प्रस्ताव तयार केला आहे. पावसाळ्यामध्ये बर्‍याच नद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. शक्य झाल्यास हे पाणी दुष्काळग्रस्त नद्यांमध्ये वळवता येईल.

ऑक्टोबर २००२ मध्ये तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दुष्काळग्रस्त स्थिती सुधारण्यासाठी देशातील महत्त्वाच्या नद्यांना जोडण्याविषयी एक योजना बनवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीसह देशातील ६० नद्यांना जोडण्याच्या एका योजनेला मान्यता दिली होती.

ही योजना कार्यान्वित झाल्यास दुष्काळामुळे नापीक ठरलेली लाखो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणणे शक्य होईल. नद्यांना जोडल्याने वीजनिर्मिती करणेही शक्य होईल. गंगा, गोदावरी आणि महानदी या मुबलक पाणी असलेल्या नद्यांना इतर नद्यांशी जोडू शकतो. त्यासाठी या नद्यांवर मोठे बंधारे उभारू शकतो. पूर आणि दुष्काळ यांवर तोडगा काढण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगितले आहे.

स्वच्छ पाणी न मिळाल्याने प्रतिवर्षी होतो २ लाख लोकांचा मृत्यू !
नीती आयोगाने गेल्या वर्षी पाण्याविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये देशातील जवळजवळ ६० कोटी लोक पाण्याच्या गंभीर संकटाला सामोरे जात असल्याचे म्हटले होते. वर्ष २०३० पर्यंत देशात पाण्याची मागणी उपलब्ध पाणीपुरवठ्याच्या दुप्पट होणार आहे, तसेच सकल राष्ट्रीय उत्पादन ६ टक्क्यांनी घटणार आहे. स्वच्छ पाणी न मिळाल्याने प्रतिवर्षी २ लाख लोकांचा मृत्यू होत आहे. काही स्वतंत्र संस्थांच्या अहवालानुसार देशातील ७० टक्के पाणी प्रदूषित असल्याने ‘जल गुणवत्ता यादी’त १२२ देशांमध्ये भारत १२० व्या स्थानावर आहे.

चेन्नईमध्ये भीषण जलसंकट !
या दिवसांत दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नईमध्ये पाणी मिळवण्यासाठी लागणार्‍या लांब-लांब रांगा आणि या रांगांमध्ये होणारी भांडणे सर्वत्र पहायला मिळतात. काही लोक पाणीटंचाईमुळे अंघोळही करू शकत नाहीत. हॉटेलमध्ये लोकांना पाण्याच्या वापराविषयी चेतावणी दिली जाते. देशातील सहाव्या क्रमांकाचे सर्वांत मोठे शहर असलेल्या चैन्नईची ही स्थिती आहे. या शहरातील ४ जलसाठे सुकून गेले आहेत. तेथील लोकांना आता सरकारच्या टँकरने पुरवण्यात येणार्‍या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. काही ठिकाणी लोक विहिरींमधून पाणी घेण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु भूमीच्या आतील पाण्याची पातळी पुष्कळ खाली गेली आहे. घरांमध्ये नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा कधीही बंद होऊ शकतो, अशी भीती शहरातील लोकांना भेडसावू लागली आहे.

महाराष्ट्रामध्ये जलसाठे पडत आहेत ओस !
महाराष्ट्रातील ४ मोठ्या जलसाठ्यांमध्ये केवळ २ टक्के पाणी शिल्लक आहे. तेथील ६ मोठ्या जलसाठ्यांचे पाणी वापरण्यायोग्य राहिले नाही. सरकारने जलसाठे जोडण्याची योजना राबवण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी केली जात आहे.

जगातील २१ शहरांमध्ये डे-झिरो स्थिती निर्माण होणार !
‘वाटर एड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने एका अहवालात म्हटले आहे की, वर्ष २०३० पर्यंत जगातील २१ शहरांमध्ये ‘डे-झिरो’ची स्थिती निर्माण होणार आहे. वर्ष २०४० पर्यंत भारतासह ३३ देशांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल, तसेच वर्ष २०५० पर्यंत जगातील २०० शहरांमध्ये ‘डे-झिरो’ स्थिती असेल.

सध्या देहलीला प्रतिदिन ४७० कोटी लिटर पाणी लागते; परंतु त्यापैकी केवळ ७५ टक्के एवढ्याच पाण्याचा पुरवठा होतो. यातील अर्धा भाग हरियाणातून येतो, तर उर्वरित पाणी गंगा नदी आणि भूमिगत जलस्रोत यांमधून उपलब्ध होते. देहलीतील ९० टक्के भूमिगत जलस्रोतांची पातळी गंभीररित्या खाली गेली आहे. देहलीत विविध भागांमध्ये जलस्तर प्रतिवर्षी २ मीटर खाली जात आहे. देहलीचे १५ टक्के क्षेत्र पाण्याविषयी संवेदनशील ठरले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार वर्ष २०२८ पर्यंत देहली जपानमधील टोकियोला मागे टाकून सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर ठरणार आहे. या शहराची लोकसंख्या ३ कोटी ७२ लाखांपर्यंत पोचणार आहे. तोपर्यंत देहलीमध्ये पाण्याची कमतरता ४० टक्के एवढी वाढेल.

अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेक्षणानुसार जगामध्ये ३२ कोटी ट्रिलियन गॅलन पाणी आहे. एका गॅलनमध्ये ३.७ लिटर पाणी असते. या एकूण पाण्यापैकी केवळ २ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे आणि त्यातील अर्धे म्हणजे १ टक्का पाणी आपल्याला सहज उपलब्ध आहे. यापैकी भारताकडे केवळ ४ टक्के पाणी आहे; मात्र जगातील एकूण लोकसंख्येपैकी १८ टक्के लोक भारतात रहातात. भूमीच्या दृष्टीने पाहिल्यास भारताकडे पृथ्वीचा केवळ २.५ टक्के एवढाच भाग आहे. जगात पिण्याचा पाण्याचा मोठा वाटा भूमिगत पाण्यापासून मिळतो. भारतात आवश्यकतेपेक्षा ७० टक्के अधिक भूमिगत पाणी काढले जाते. केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालानुसार भूमिगत पाण्याचा स्तर जलदगतीने खाली जात आहे. जगातील एकूण भूमिगत पाण्यापैकी २४ टक्के पाणी भारतात वापरले जाते.

पाण्याची बचत करण्यासाठी पुढील अगदी छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या !
१. फवारा किंवा नळ यांद्वारे अंघोळ केल्यास जवळजवळ १८० लिटर पाणी वापरले जाते. बालदीमध्ये पाणी घेऊन अंघोळ केल्यास केवळ १८ लिटर पाणी व्यय होते.

२. शौचालयामध्ये ‘फ्लॅश टँक’चा वापर केल्याने एका वेळी १३ लिटर पाण्याचा वापर होतो; परंतु या ठिकाणी बालदीचा वापर केल्यास केवळ ४ लिटर पाण्यामध्ये काम होते. अशा प्रकारे प्रत्येक वेळी ९ लिटर पाण्याची बचत होते.

३. बरेच लोक दाढी करतांना नळ चालूच ठेवतात. असे केल्याने हे लोक जवळजवळ ११ लिटर पाणी वाया घालवतात. हेच काम मग (पाण्याचे भांडे) घेऊन केल्यास १ लिटर पाण्यामध्ये काम होऊन जाते; म्हणजे प्रतिव्यक्ती १० लिटर पाण्याची बचत होते.

४. दात घासतांना नळ चालू ठेवण्याच्या सवयीमुळे ३३ लिटर पाणी अनावश्यक वाहून जाते. मगामध्ये पाणी घेऊन दात घासल्यास एक लिटर पाण्यामध्ये काम होते; म्हणजेच प्रतिव्यक्ती प्रतिदिन ३२ लिटर पाण्याची बचत होऊ शकते.

५. महिला घरी कपडे धुतांना नळ चालूच ठेवतात. असे केल्याने १६६ लिटर पाणी वाया जाते. त्याऐवजी बालदीमध्ये पाणी घेऊन कपडे धुतल्यास १८ लिटर पाण्यामध्ये काम होऊन जाते. थोडी सतर्कता बाळगल्यास प्रतिदिन प्रतिघर १४८ लिटर पाण्याची बचत होऊ शकते.

६. गवताच्या मैदानाला पाणी देतांना १० ते १२ सहस्र लिटर पाण्याचा अपव्यय होतो. एवढ्याच पाण्याने एका लहान कुटुंबाला एका मासाचे पाणी उपलब्ध करू शकतो.

आपण पाण्याची निर्मिती करू शकत नाही. पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून त्याची निर्मिती मानवाच्या हातात नाही. पाण्याच्या एकएक थेंबाची बचत करणे, ही काळाची आवश्यकता आहे आणि तेवढेच आपल्या हातात आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *