आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपाने धनगर समाजाला फसवले !: नाना पटोले.

धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यव्यापी बैठक संपन्न.

शिवाजी सेलोकर
मुंबई, दि. ४ मार्च
धनगर समाज हा समाजातील दुर्लक्षित घटक असून काही लोकांनी प्रलोभने दाखवून समाजाची फसवणूक केली. यातून समाजातील मुठभर लोकांचा फायदा झाला पण समाज मात्र वंचितच राहिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्षाने पाच वर्ष राज्यात सत्ता भोगली पण आरक्षण काही दिले नाही, ही धनगर समाजाची घोर फसवणूक आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
इस्लाम जिमखाना येथे धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सचिन नाईक,  देवानंद पवार, अलकाताई गोडे, हरिभाऊ शेळके, ॲड. संदिपान नरोटे आदी उपस्थित होते. यावेळी धनगर समाजाचे प्रतिक असलेलं घोंगडं व काठी देऊन नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला.कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, धनगर समाज मागणारा नसून देणारा आहे. आरक्षणाच्या बाबतीतही आदिवासींचे काढून आरक्षण द्यावे ही मागणी नाही. पण भारतीय जनता पक्षाने आरक्षणाचे आश्वासन देऊन धनगर व आदिवासी समाजात वाद लावून दिला. पाच वर्ष राज्यात फडणवीस सरकार होते आणि दिल्लीत भाजपाचेच सरकार असतानाही फडणवीस यांनी समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. सत्ता येताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणचा निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. धनगर समाजाने वज्रमूठ बांधावी असे आवाहन करून सन्मानाची वागणूक व समाजाला सत्तेत वाटा देण्यासाठी प्रयत्न करु असे पटोले म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ करतात ऐकत कोणाचेच नाहीत ते ऐकताच फक्त नागपूरचे असा टोला लगावून मोदींनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. सर्वात जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या विकून त्या भांडवलदारांच्या घशात घातल्यानंतर आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्याच संपणार आहेत. आरक्षण संपवण्याचा भाजपा-आरएसएसचा हा डाव आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले. धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्याबाबत काँग्रेस पक्ष सकारात्मक असून धनगर समाजातील कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात सन्मान दिला जाईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *