By : Shankar Tadas
कोरपना (बिबी):
बिबी गाव अनेक बाबतीत प्रसिद्ध आहे. कोरपना तालुक्यातील हे गाव माजी आमदार चटप साहेब यांचे म्हणून पूर्वी प्रसिद्ध होते. स्मार्ट व्हिलेज म्हणून उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी प्रसिद्ध केले. मात्र सर्वदूर ओळख आज कशामुळे असेल तर डॉ. गिरीधरजी काळे यांच्यामुळे. हातपाय मोडले किंवा दुखापत झाली तर लोकांना त्यांची आठवण येते. त्यांची कीर्ती ऐकून चंद्रपूर जिह्वाच नव्हे तर जवळपासचे इतर जिल्हे आणि इतर राज्यातूनही लोक उपचारासाठी येथे येतात. म्हणूनच त्यांच्या घरी रोज सकाळी रुग्णांची लांब रांग लागते. अवयव लचकले, मुरगळले, मोडले किंवा अखडले तर त्यांच्यावर पारंपरिक पद्धतीने उपचार केले जातात. बांबूच्या चिपा, सुती कापड आणि तिळाचे तेल इतकेच साहित्य. बाकी सर्व यंत्र म्हणजे त्यांचा दीर्घ अनुभव आणि हाताचे कौशल्य. एखादा सहकारी असतो सोबतीला. त्यांच्या घराच्या पायरीवर बसून ते रोज मोफत सेवा देतात. आपल्याला मिळालेला गुण देवाने दिला असून तो आपण लोकांच्या कल्याणासाठी वापरतो अशी त्यांची भावना आहे.
मुळात शासनाच्या किंवा खासगी आरोग्य यंत्रणा असताना लोकांची येथे गर्दी का होत असावी, हा गंभीर प्रश्न आहे. येथे थेट उपचार होतात. विनाकारण तपासणी, एक्सरे आदी करावी लागत नाही. केली असेलच तर ते स्वतः पाहून निदान करतात. काहींच्या बाबतीत मात्र ते दवाखान्याचा मार्ग दाखवतात. सेवाभावी वृत्ती म्हणजे काय याचा उत्तम आदर्श म्हणजे डॉ. गिरीधरजी काळे. त्यांची कीर्ती लक्षात घेऊन बिबी ग्रामसभेने त्यांना ‘डॉक्टर’ सन्मान घोषित केलेला आहे. कोणत्याही निष्णात वैद्याचे सर्व गुण त्यांच्यात असून आज विलुप्त होत चाललेली पारंपरिक उपचार पद्धती त्यांनी जिवंत ठेवली आहे. त्यांच्या कार्याला शतशः नमन.





