By : Shankar Tadas
गडचांदुर
गडचांदूर शहरातील सिमेंट कंपनीच्या घनकचरा व्यवस्थापनामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी व नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या अनुषंगाने ३ जानेवारी २०२६ रोजी नगराध्यक्ष निलेश शंकर ताजने यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. सदर विषय दीर्घकाळ प्रलंबित असून नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावेळी दुर्गंधीवर तोडगा निघेपर्यंत सिमेंट कंपनीचा घनकचरा प्रकल्प कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत नगराध्यक्षांनी स्पष्टपणे नमूद केले की, गडचांदूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि जनतेला वेठीस धरून कोणतेही घनकचरा प्रकल्प सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाणार नाही.
सविस्तर चर्चेनंतर सर्वानुमते खालील चर्चा व निर्णय घेण्यात आले.
चर्चा व निर्णय :
1. दुर्गंधी व आरोग्यविषयक समस्या
चर्चा: कचऱ्याच्या साठवणुकीमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
निर्णय: कंपनीस कचरा व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, दुर्गंधी नियंत्रणासाठी Bio-Enzyme Spray चा वापर वाढवण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच एका आठवड्याच्या आत परिसर दुर्गंधीमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले.
2. कचरा प्रक्रिया (Processing) बाबत त्रुटी
चर्चा: कचऱ्याची योग्य व शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होत नसल्यामुळे दुर्गंधीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
निर्णय: वरील उपाययोजना पूर्ण होईपर्यंत सिमेंट कंपनीचा घनकचरा प्रकल्प / डम्पिंग यार्ड प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
3. कचरा वाहतुकीदरम्यान होणारा त्रास
चर्चा: कचरा वाहतुकीदरम्यान रस्त्यावर घाण व घातक द्रव्ये सांडत असल्याचे निदर्शनास आले.
निर्णय: अनावश्यक कचरा वाहतूक करणारी वाहने शहराच्या हद्दीबाहेर ठेवण्याबाबत पोलीस विभागाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.
4. कायदेशीर व पर्यावरणीय पालन
चर्चा: प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले.
निर्णय: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) च्या अहवालातील सर्व अटी व शिफारशींची पूर्तता बंधनकारक करण्यात आली असून, संबंधित अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस नगरपरिषदेतील सर्व पक्षांचे प्रतिनिधी(गटनेते) , सिमेंट कंपनीचे अधिकारी तसेच पोलीस व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या निर्णयांचा मुख्य उद्देश गडचांदूर शहरातील नागरिकांचे आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरणीय सुरक्षितता जपणे हा असून, समस्या पूर्णतः सुटेपर्यंत प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यासाठी कटिबद्ध असेल, असे नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी पत्रकात म्हटले आहे.
#gadchnadur_update
#Update
#गडचांदुर
#gadchandur





