By : Shankar Tadas
गडचांदूर : येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने तांदूळ दिला तर गहू आला नसल्याचे सांगून देण्यास नकार दिला. याबद्दल संबंधित ऍप वर चेक केले असता गहू आणि तांदूळ दिल्याचे लक्षात आले. याबद्दल आवाज उठवणाऱ्या ग्राहकाला दुकानदाराने दादागिरी करीत थापड मारल्याची घटना नुकतीच उघडकीस आली.
🔴प्राप्त माहितीनुसार, गडचांदूर येथील राशन कार्डधारक अमोल ठमके हा युवक सरकारी स्वस्त धान्य दुकानात गेला असता नियमानुसार गहू आणि तांदूळ देण्याऐवजी फक्त सहा किलो तांदूळ दिला. गहू आलाच नसल्याचे दुकानदार बापूराव गोरे यांनी सांगितले. नंतर सदर युवकाने ‘मेरा राशन’ ऍप वर चेक केले असता सहा किलो गहू आणि सहा किलो तांदूळ प्राप्त झाल्याचे दिसून आले. दुकानदाराला या गैरव्यवहाराबद्दल अमोल ठमके यांनी विचारले असता ‘जास्त हुशारी करू नकोस’ म्हणत गालावर थापड हाणली. दुकानदाराने बिल देण्यासही नकार दिला. याप्रमाणे खुलेआम मनमानी सुरू असल्या बाबत गोदाम प्रभारी कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता प्रत्यक्ष दुकानात येऊनच माहिती देतो असे सांगितले मात्र ते आले नाही.
🔴अधिकारी आणि दुकानदाराच्या संगनमताने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात गैरव्यवहार सुरू असल्याचे दिसून येत असून याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी या गैरप्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कर्मचारी आणि दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
🔴अमोल ठमके याला मारहाण केल्याच्या घटनेबाबत दुकानदार बापूराव गोरे यांना विचारले असता त्यांनी सदर युवक नशेत होता व शिवीगाळ केली असल्याचे सांगितले. तसेच गोदाम प्रभारी यांच्या कडून अपुरे धान्य प्राप्त होत असल्याचेही ते म्हणाले.





