Home
Home मुंबई करीरोडमध्ये ‘सिने-नाट्य सांस्कृतिक गुढी’चा पहिला कलावंत मेळावा उत्साहात; नवोदित कलाकारांना मिळणार नवे...

करीरोडमध्ये ‘सिने-नाट्य सांस्कृतिक गुढी’चा पहिला कलावंत मेळावा उत्साहात; नवोदित कलाकारांना मिळणार नवे व्यासपी

लोकदर्शन मुंबई करिरोड 👉राहुल खरात

लोकदर्शन मुंबई, करीरोड (प्रतिनिधी – राहुल खरात):
तळागाळातील कलावंतांना एकत्र आणून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने ‘सिने-नाट्य सांस्कृतिक गुढी’ या संस्थेचा पहिला कलावंत मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. करीरोड येथील राशी स्टुडिओ (माने वखार) येथे हा रंगतदार सोहळा संपन्न झाला.

या मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे विविध क्षेत्रातील कलाकारांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करावी, परस्परांशी संवाद साधून नव्या संधी निर्माण कराव्यात आणि कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. महाराष्ट्र बाजारपेठचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कौतिक दांडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सदानंद राणे आणि हास्य अभिनेते कांचन पगारे यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे आयोजन दिलीप दळवी, डॉ. किशोर खुशाले, अनिल सुतार, महेश्वर तेटांबे, शीतल माने-शेळके आणि सिद्धी कामथ यांनी केले.

मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत पाहायला मिळाली. लावणी नृत्य, एकपात्री अभिनय आणि नाट्यप्रवेशांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेष आकर्षण ठरले ते नृत्यदिग्दर्शक अनिल सुतार यांनी सादर केलेले स्व. शाहीर दादा कोंडके यांच्या गीतांवरील नृत्य. याशिवाय डॉ. किशोर खुशाले यांनी वाद्यांची शास्त्रोक्त माहिती देत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी आपल्या ओघवत्या आणि मधाळ शैलीत करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सिद्धी कामथ आणि शीतल माने-शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच अरविंद घेवडे, प्रमोद मोहिते, आबा पेडणेकर, शंकर पिसाळ, अविनाश राऊत आणि उदय साटम यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या शेवटी महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, कलाकार आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.
“कलावंतांच्या कल्पकतेला योग्य दिशा देणारा हा मेळावा भविष्यात नवोदित कलाकारांसाठी मैलाचा दगड ठरेल,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here