लोकदर्शन पनवेल 👉राहुल खरात
हातकणंगले / नवीन पनवेल :
कवी सरकार इंगळी पब्लिकेशन आणि विद्यानिकेतन शैक्षणिक व सामाजिक संस्था, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ७ जून रोजी सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वाई नगरीत ५ वे ‘मिरग नक्षत्र’ राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी नवीन पनवेल (जि. रायगड) येथील ज्येष्ठ साहित्यिक व कवी मा. नागनाथ श्रीपती डोलारे यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची अधिकृत घोषणा कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
नागनाथ डोलारे यांच्या निवडीबद्दल सह-संपादक राहुल खरात, ज्येष्ठ लेखक विलास खरात आणि मनीषा कांबळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयातून वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी ग्रेड-१ (S.S.O. Gr.1) पदावरून जून २०१४ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर नागनाथ डोलारे यांनी स्वतःला पूर्णपणे साहित्य व समाजसेवेसाठी वाहून घेतले. अल्पावधीतच त्यांनी साहित्य क्षेत्रात आपली स्वतंत्र आणि प्रभावी ओळख निर्माण केली आहे.
मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असलेल्या डोलारे यांनी ‘फुलपाकळ्या’, ‘मायेचा स्पर्श’, ‘निसर्गाचा साज’, ‘मानवतेचे सिंहासन’ हे मराठी कविता संग्रह, ‘दिल की बात’ व ‘सृष्टी का उपहार’ हे हिंदी कविता संग्रह, ‘आदर्श राज्य’ हा वैचारिक ग्रंथ, ‘स्वर्ग’ हा कथासंग्रह तसेच ‘लावण्य लेणी’ हा चारोळी संग्रह अशा विविध साहित्यकृतींची निर्मिती केली आहे.
त्यांच्या उल्लेखनीय साहित्यसेवेसाठी महाराष्ट्रातील अनेक नामांकित संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक साहित्य संमेलनांमध्ये अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी गरजूंसाठी विशेष योगदान दिले असून, त्यांच्या कार्याचा मोठा आदर व्यक्त केला जातो.
एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यापासून संवेदनशील साहित्यिकापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. त्यामुळे ७ जून रोजी होणाऱ्या या राज्यस्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्षपद ते भूषवणार असल्याने साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नागनाथ डोलारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन निश्चितच यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत राहुल खरात, विलास खरात आणि मनीषा कांबळे यांनी संमेलनाच्या यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.





