लोकदर्शन जुन्नर 👉डॉ रिता मदनलाल शेटीया
लोकदर्शन जुन्नर, (प्रतिनिधी) – ता. 9 फेब्रुवारी 2026 रोजी श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थसंकल्प 2026 परिप्रेक्ष्य’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अँड. संजय शिवाजीराव काळे साहेब व अध्यक्ष प्रतिनिधी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे यांनी दिली.
कार्यशाळेचे उद्घाटन पुणे येथील प्रसिद्ध लेखिका, सहा. प्राध्यापिका व रिता इंडिया फाउंडेशनच्या संचालिका प्रा. डॉ. रिता मदनलाल शेटीया यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे होते. या निमित्ताने अर्थसंकल्पावरील पोस्टर प्रदर्शन व नाविन्यपूर्ण रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे डॉ. सचिन पवार आणि कला व वाणिज्य महाविद्यालय, चाकण येथील डॉ. उमेश भोकसे यांनी काम पाहिले.
प्रमुख पाहुण्या डॉ. रिता शेटीया यांनी पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विकसित भारतासाठी गतिमान, सर्वसमावेशक व रोजगाराभिमुख अर्थसंकल्पाच्या तरतुदींवर मार्गदर्शन केले. अर्थसंकल्पातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचली तरच सर्वसमावेशक विकास साधता येईल, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. वाघमारे यांनी भारत हा शेतीप्रधान देश असल्याने कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या एचसी. डॉ. सवीता शेटीया, प्रा. डॉ. गोरक्षनाथ सानप, प्रो. डॉ. प्रताप फलफले, डॉ. श्रीकांत फुलसुंदर, डॉ. रमेश काशिदे, वाणिज्य विभाग प्रमुख सतीश जाधव, पर्यवेक्षक श्रीमंते आदी मान्यवर उपस्थित होते. विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सचिन कसबे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एम. आर. शेलार, सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. एच. काळे तर आभार प्रदर्शन प्रा. आर. ए. मोरे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. पी. बी. सुकाळे, प्रा. जावेद शेख व श्री. मितेश गाडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास प्राध्यापक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





