Home
Home Breaking News कामगार-शेतकरी प्रश्नांवर भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा; कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे सुभाष धोटे यांचे...

कामगार-शेतकरी प्रश्नांवर भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा; कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे सुभाष धोटे यांचे आवाहन

लोकदर्शन चंद्रपूर 👉 मोहन भारती

चंद्रपूर : देशातील विविध दहा कामगार संघटनांनी गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या ‘भारत बंद’च्या हाकेला काँग्रेस पक्षाने जाहीर आणि संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सूचनेनुसार हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कामगार वर्गासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून त्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. नव्या कायद्यांमुळे रोजगाराच्या संधी कमी होण्याची शक्यता असून सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेवरही परिणाम होत असल्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली आहे. तसेच केंद्र सरकारची आर्थिक धोरणे कामगार व शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, विविध शेतकरी संघटनांनीही ‘भारत बंद’ला पाठिंबा दिल्याने कामगार-शेतकरी एकजुटीचे आंदोलन अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजीच्या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी केले आहे.

कामगार व शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी भारत बंदमध्ये सहभागी व्हावे, असेही आवाहन धोटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here