लोकदर्शन गडचांदूर:👉अशोककुमार भगत
आयुष्यमती मनोरमा भाऊराव खाडे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त गडचांदूरात एक भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला. आयुष्यभर संघर्ष करून कुटुंबाला आधार देणाऱ्या या मातेसाठी हा दिवस केवळ वाढदिवस नव्हता, तर तिच्या त्यागाला मिळालेली जिवंत सलामी होती.
गडचांदूर येथील डॉ. आंबेडकर भवनाच्या प्रांगणात हा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. भंते विरय्यो पन्नो (गोंदिया) यांच्या परित्राणपाठ आणि धम्मदेशनेने कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची लाभली. कुटुंबीय, आप्तेष्ट आणि मित्रांच्या उपस्थितीत आनंदाचे क्षण अनुभवले गेले.
मनोरमा आईंचा मुलगा विक्की खाडे यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला. भावना व्यक्त करताना तो म्हणाला,
“आई म्हणजे माझ्या आयुष्याचा खजिना आहे. वडील लहानपणीच गेले, पण आईने कधीही हार मानली नाही. मोलमजुरी करून तिने आम्हाला मोठे केले. तिच्या संघर्षाचे वर्णन शब्दांत मांडणे अशक्य आहे.”
२०२१ मध्ये आलेल्या अर्धांगवायूमुळे मनोरमा आई अपंग झाल्या, तरी मुलाने खचून न जाता अधिक ताकदीने उभे राहण्याचा निर्धार केला. बुद्ध धम्माच्या विचारांनी प्रेरित होऊन त्याने सहा महिने आधीच ठरवले होते की, “आई डोळ्यांसमोर असतानाच तिला आनंद द्यायचा.”
वाढदिवसाच्या दिवशी आईच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि हास्य पाहून विक्कीचे डोळे पाणावले.
“तिच्यासाठी कितीही केलं, तरी ते कमीच आहे,” असे तो म्हणाला.
हा वाढदिवस केवळ एक उत्सव न राहता, संघर्ष, माया आणि कृतज्ञतेची भावनिक आदरांजली ठरला. उपस्थित सर्वांनी मनोरमाताईंना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.





