Home
Home गडचांदूर / कोरपणा निमणीतील बाल सुसंस्कार शिबिरात २८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

निमणीतील बाल सुसंस्कार शिबिरात २८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

लोकदर्शन बाखर्डी 👉उमेश राजूरकर

बाखर्डी, प्रतिनिधी : कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या निमणी येथे अर्थ फाउंडेशन गडचांदूरच्या वतीने आयोजित श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलभूषण मोरे यांनी २८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये अशा बाल सुसंस्कार शिबिरांचे आयोजन होणे आवश्यक असल्याचे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले. मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या शारीरिक आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबिरात मुलांची शारीरिक ताकद वाढवण्यासाठी योग, प्राणायाम, मैदानी खेळ तसेच मलखांब, लाठी-काठी यांसारख्या पारंपरिक खेळांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच आई-वडील व मोठ्यांचा आदर करणे, भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे, देशभक्तीपर गीते, प्रार्थना, भजन, वक्तृत्व आणि सामूहिक शिस्तीचे धडेही विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. ध्यान व विविध बौद्धिक खेळांच्या माध्यमातून मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यावर भर दिला जात आहे.

यावेळी संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष उमेश राजुरकर, माजी तमूस अध्यक्ष संजय राळे, संतोष गारघाटे, दत्तू सुर्तेकर, साहिल धोटे, साहिल टोंगे, जनार्धन सावरकर, लक्ष्मण टोंगे, गणेश सुर्तेकर, आनंदराव पाटील आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातून मोझरी येथे शिक्षण घेणारे प्रथमेश पाटील, स्वागत गारघाटे, ध्रुप वाघमारे आणि संघर्ष कोटरंगे या विद्यार्थ्यांनी निमणी येथे श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन केले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here