Home
Home चंद्रपूर अंधश्रद्धा, जातीभेदाविरुद्ध लढा देणाऱ्या सत्यशोधक रघुनाथ ढोक यांना चंद्रपूर येथे ‘भारतीय संविधान...

अंधश्रद्धा, जातीभेदाविरुद्ध लढा देणाऱ्या सत्यशोधक रघुनाथ ढोक यांना चंद्रपूर येथे ‘भारतीय संविधान सन्मान – राष्ट्रीय गौरव पुरस्कार’

लोकदर्शन चंद्रपूर / भद्रावती :👉मोहन भारती

आधुनिक सत्यशोधक चळवळीचे प्रेरणास्थान ठरलेल्या पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, तसेच महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती (महाराष्ट्र शासन) चे सदस्य असलेले समाजसेवक रघुनाथ ढोक यांना भारतीय संविधान दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन यांच्या निमित्ताने “भारतीय संविधान सन्मान – राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025” जाहीर झाला आहे.

हा सन्मान सोहळा दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, तथागत बुद्धविहार, नविन सुमठाना, भद्रावती (जि. चंद्रपूर) येथे संपन्न होणार आहे. यावेळी सन्मानपत्र, मोमेंटो, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे आयोजन संविधान सन्मान समारंभ समिती, सुमठाना – भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रविण चिमुरकर असतील. स्वागताध्यक्ष म्हणून मा. मनोजभाऊ मोडक, मार्गदर्शक म्हणून जेष्ठ साहित्यिक मधुकररावजी बावलकर (तेलंगणा), उद्घाटक मा. रविंद्र चिवडे तर प्रमुख उपस्थित म्हणून ब्रीजभूषण पाझारे, अॅड. पूनम वाघमारे (उमरे), मा. सुरज गावंडे, डॉ. अजय दहेगावंकर, मा. प्रभाकर डोंगरेसर उपस्थित राहणार आहेत.

विज्ञानयुगातही समाजात रुजलेल्या अंधश्रद्धा, मुहूर्त, कर्मकांड व जातीभेदाच्या विरोधात लढा देत रघुनाथ ढोक हे गेली अनेक वर्षे सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश तसेच जातिविरहित सामाजिक विधी विनामूल्य पार पाडत आहेत. विवाह व विविध सामाजिक कार्यक्रमांत ते नेहमीच राष्ट्रीय ग्रंथ ‘भारताचे संविधान’ भेट देऊन उद्देशिकेच्या वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करतात.

नुकतेच त्यांनी दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी, संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगली येथे उच्चशिक्षित चमार समाजातील वधू-वरांचा सत्यशोधक विवाह पार पाडताना 75 संविधान प्रती व संत रोहिदास ग्रंथ भेट देत एक नवा सामाजिक संदेश दिला. त्यांच्या या कार्यामुळे सत्यशोधक चळवळीला नवे बळ प्राप्त झाले आहे.

गेल्या पाच वर्षांत त्यांनी महाराष्ट्र व तेलंगणात 54 सत्यशोधक विवाह व 15 वास्तू / गृहप्रवेश विधी मोफत पार पाडले आहेत. सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात कार्यरत राहत त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले गीतचरित्र यांसारखी महत्त्वपूर्ण पुस्तके विविध भाषांत प्रकाशित केली आहेत. लवकरच सामान्य जनतेला सहज भाषेत संविधान समजावे यासाठी डॉ. प्रल्हाद वडगावकर लिखित ‘भारताचे संविधान’ हे पुस्तक ते प्रकाशित करणार आहेत.

पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत असतानाही त्यांनी समाजकार्याची ज्योत अखंड तेवत ठेवली आहे. या पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक शिवदास महाजन (पुणे) व प्रा. सुकुमार पेटकुले (तेलंगणा) यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची माहिती आयोजक वामन दुर्योधन, समितीचे अध्यक्ष निलेश पाटील, सचिव आनंद भगत, गौरव शेळके व कोषाध्यक्ष भीमराव लोखंडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here