लोकदर्शन आटपाडी👉रघुनाथ ढोक
आटपाडी — फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आटपाडी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष समाजसेवक उत्तम जाधव यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता आटपाडी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तसेच महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या शुभहस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची एकत्रित छायाचित्र असलेली फोटो फ्रेम, शाल, पुष्पगुच्छ तसेच महापुरुषांचे ग्रंथ भेट देऊन नगराध्यक्ष जाधव यांचा गौरव करण्यात आला. यावेळी समाजसेवक बजरंग फडतरे, संपादक अंकुश मुडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी मार्गदर्शन करताना रघुनाथ ढोक म्हणाले की, आटपाडी शहराचे प्रथम नागरिक म्हणून उत्तम जाधव यांनी कोणताही भेदभाव न करता सर्व वॉर्डांतील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा व इतर मूलभूत सुविधांकडे जातीने लक्ष द्यावे. नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, जनसेवालाच ईश्वरसेवा मानून समाजकार्यासाठी अधिक वेळ द्यावा व फुले दांपत्याच्या कृतिशील विचारांचा वसा पुढे न्यावा. गावातील वाड्या-वस्त्यांवरील गरजू व गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी, मानवता हा एकच धर्म मानून निस्सीम सेवा करावी, असेही त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष उत्तम जाधव म्हणाले की, आटपाडीच्या जनतेने भरघोस मतांनी दिलेल्या संधीचे सोने करून कोणताही दूजाभाव न करता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे. साहित्यिक, ऐतिहासिक परंपरा जपून शहराच्या नावलौकिकात भर घालण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगार संधी निर्माण करणे, शेतकरी बांधवांसाठी आधुनिक शेती व कृषीमाल निर्यातीसाठी मार्गदर्शन केंद्र उभारणे, यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोग्य सुविधा, अंतर्गत रस्ते व पाणीपुरवठा यांचा समतोल राखून सर्व जाती-धर्मात सलोखा व शांतता निर्माण करत “सुंदर आटपाडी” ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





