लोकदर्शन पुणे (प्रतिनिधी)👉डॉ. रिता शेटीया
फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय पुस्तक महोत्सव २०२५ मध्ये डॉ. रिता मदनलाल शेटीया लिखित ‘सर्जनशील लेखन (क्रिएटिव्ह रायटिंग)’ या पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडले. ज्येष्ठ पत्रकार, कॉर्पोरेट सिटीझन व मनी लाइफ मासिकांच्या संपादिका विनिता देशमुख यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी डॉ. रिता यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्या विनिता देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या डिजिटल युगात ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ ही काळाची गरज बनली आहे. सोशल मीडियासह विविध प्लॅटफॉर्मवर लेखनाच्या संधी वाढल्या असून, वाचकांना आकर्षित व खिळवून ठेवणारे लिखाण महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे असून, लेखन करताना कोणत्या पायऱ्या वापराव्यात, नियम कोणते आहेत, याचे सविस्तर मार्गदर्शन यात करण्यात आले आहे.
डॉ. रिता शेटीया यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार निवड-आधारित क्रेडिट सिस्टीम (CBCS) लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गरजा व आवडी ध्यानात घेऊन ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ विषयाबद्दल विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढावे व त्यांची सर्जनशीलता विकसित व्हावी, या उद्देशाने हे पुस्तक सोप्या व स्पष्ट भाषेत मांडले आहे. पुस्तकात चार प्रकरणांचा समावेश असून, सर्जनशील लेखनाची मूलभूत तत्त्वे, घटक, पारंपारिक प्रकार आणि सर्जनशील लेखनातील नवे ट्रेंड यांचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे. अर्थ, महत्त्व, उदाहरणे, चित्रे व फॉर्म यांद्वारे संकल्पना अधिक स्पष्ट करण्यात आल्या आहेत. क्रेडिट सिस्टीम विद्यार्थ्यांसाठी नवीन असल्याने पुस्तक अधिक सुलभ आणि उपयुक्त ठरेल, यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला टी. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. सुनील भंडगे, सरस्वती मंदिर नाईट महाविद्यालयाचे ग्रंथपाल राजेश अगवणे, सामाजिक कार्यकर्त्या सुहासिनीताई बिवलकर तसेच माजी शिक्षिका डॉ. सविता शेटीया उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माळी यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मर्सी नुअमनीलम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





