Home
Home Breaking News राजुरा–जिवतीच्या प्रश्नांना गती : महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय

राजुरा–जिवतीच्या प्रश्नांना गती : महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय

लोकदर्शन नागपूर (प्रतिनिधी)👉मोहन भारती

राज्याचे कार्यतत्पर महसूलमंत्री मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विधान भवनातील दालन क्रमांक ०२ मध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयांच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीच्या प्रारंभी राजुरा शहरातील देशपांडेवाडी परिसरातील सर्व्हे क्र. ०१ ते ०८ मधील भोगवटदार वर्ग ०२ च्या प्लॉटना निशुल्क वर्ग ०१ मध्ये रूपांतरित करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांचे उपस्थितांनी हृदयपूर्वक आभार मानले.

या बैठकीत दि. १५ जुलै २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयांच्या अनुषंगाने जिवती तालुक्यातील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जिवती तालुक्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती, १९८० पूर्वीपासून वनेत्तर वापरात असलेले ६२०७.२५ हेक्टर क्षेत्र वनसंज्ञेतून वगळण्याबाबतची कार्यवाही, तसेच २६ ऑक्टोबर १९८० ते १२ डिसेंबर १९९६ या कालावधीत वनेतर वापराखाली असलेले २६५७.९६ हेक्टर क्षेत्र वनसंज्ञेमधून वगळण्यासंदर्भातील सुरू असलेल्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.

तसेच महाराष्ट्र–तेलंगाना सीमेवरील जिवती तालुक्यातील १५ गावांमधील शेतजमिनींच्या प्रश्नांबाबतची स्थिती, जिवती तालुक्यासाठी महसूल विभागांतर्गत कोतवाल व तहसीलदार (सं. गां. नि. यो.) पदनिर्मिती, जिवती शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१९ मध्ये मंजूर ६६४ घरकुलांना बांधकाम मंजुरी, तसेच वनविभागाच्या अडथळ्यामुळे रखडलेल्या कोदेपूर, जिवती व गुडसेला येथील लघु सिंचन तलावांच्या कामांची प्रगती यावर सविस्तर चर्चा झाली.

गोंडपिपरी तालुक्यातील मौजा राळापेठ येथील अभिलेख पंजी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्ग ०२ जमिनी वर्ग ०१ मध्ये रूपांतरित करण्यासंदर्भातील कार्यवाहीचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला.

सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना सुमोटो पद्धतीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

या बैठकीस महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, उपसचिव श्रीमती अश्विनी यमगर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, जिवतीचे तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, गोंडपिपरीचे गजानन जुमनाके आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नरेश झुरमुरे, नागपूर विभागीय आयुक्त श्रीमती लक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक रामानुजन, उपवनसंरक्षक योगेश वाघाये सहभागी झाले होते. भाजममोच्या महामंत्री कु. अल्काताई आत्राम यांच्यासह रामदास रणवीर, गोविंद टोकरे, दत्ताराज गायकवाड, अशपाक शेख, उत्तम कराळे व आशिष ताजने यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here