लोकदर्शन 👉 रवि गेलडा
बल्लारपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री व आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात राबविण्यात आलेल्या भव्य मोतीबिंदू तपासणी व उपचार मोहिमेला उल्लेखनीय यश प्राप्त झाले आहे. गेल्या तीन महिन्यांत आयोजित मोफत आरोग्य शिबिरांमध्ये तब्बल ४,००० नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली, त्यापैकी ५३२ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
शनिवार–रविवार या दोन दिवसांमध्ये मतदारसंघातील गावागावांत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती. तपासणीनंतर उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया शालिनीताई मेघे रुग्णालय, वानाडोंगरी, नागपूर येथे करण्यात आली. शस्त्रक्रियेसोबत प्रवास, निवास व भोजनाची पूर्ण सोयही आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली.
“बल्लारपूर मतदारसंघातील एकही मोतीबिंदू रुग्ण उपचाराविना राहू नये,” हा आमदार मुनगंटीवार यांचा संकल्प आहे. या ध्येयातूनच येत्या जानेवारी २०२६ पासून मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार असून गावागावांत पुन्हा मोफत तपासणी शिबिरे भरवली जाणार आहेत.
शस्त्रक्रिया झालेल्या अनेक रुग्णांनी कृतज्ञता व्यक्त करत, “आ. मुनगंटीवार यांच्या उपक्रमामुळे दृष्टी परत मिळालीच, पण जगण्याचा आत्मविश्वासही परत आला,” अशा भावना व्यक्त केल्या. या मोहिमेमुळे अनेक ज्येष्ठांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश फुलला आहे.
मुनगंटीवार यांच्या माध्यमातून आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण आणि १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, हे विशेष.





