ऍड. मोरेश्वर टेंमुर्डे यांचे मरणोत्तर देहदान ठरले प्रेरणादायी

by : Rajendra Mardane

वरोरा :  महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू नेता आणि सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध जोपासणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर विठ्ठलराव टेमुर्डे यांचे रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. निधनानंतर देहदानाचा एक दशकापूर्वी त्यांनी घेतलेला निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र अमन, जयंत, सून, नातवंडे असा परिवार आहे.

अॅड टेमुर्डे १९८५ ते १९९० व १९९० ते १९९५ असे सलग दोनदा भद्रावती वरोरा विधानसभा मतदार क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले होते. १९ जुलै १९९१ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतीपदी त्यांची निवड झाली होती. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी त्यांच्या वरोरा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवल्यावर त्यांच्या चाहत्यांनी, आप्तेष्टांनी तसेच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अॅड टेमुर्डे यांनी एक दशकांपूर्वी मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेतला होता त्यामुळे त्यांचे पार्थिव चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुपूर्द करण्यात आले.
हल्ली रक्तदानासाठी लोकांचा सहभाग वाढलेला दिसून येतो. नेत्रदानासाठीसुद्धा लोक पुढे येत आहेत. अवयव दानाचेही महत्त्व वाढताना दिसत आहे. काहीजण देहदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवताना आपण अनुभवतो पण राजकारणी व्यक्तींनी देहदान करण्याची घटना दुर्मिळ झाली, असेच म्हणावे लागते. अशात अॅड मोरेश्वर टेमुर्डे यांनी एक दशकापूर्वी घेतलेला निर्णय क्रांतिकारी आणि प्रेरणादायी आहे.
मृत्यूनंतर देह जाळला किंवा पुरला जातो. यात देहाची राख किंवा माती होते. धड जाळल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मृत्यूनंतर आपला देह इतर सहा जणांना उपयोगी पडू शकतो, त्यांना जीवदान मिळू शकते, हे त्यांनी जाणले होते. मातीत जाणारा देह दानातून इतरांच्या उपयोगात आणण्याची कल्पनाच मुळी सुखावणारी आहे. अंधश्रद्धा आणि जुन्या अनिष्ट रूढी परंपरेला तिलांजली देऊन देहदानासाठी अॅड मोरेश्वर टेमुर्डे यांनी घेतलेली भूमिका राजकारणी लोकांसाठी निश्चितच अनुकरणीय आहे, असे मत सर्वसामान्य व्यक्ती मांडताना दिसत आहेत. ‘ मरावे परी कीर्तिरूपे उरावे ‘ या संतवचनाला अनुसरून जागरूक नागरिकांनी ‘ मरावे परी देहरूपी उरावे ‘ ही अॅड. टेमुर्डे यांनी एकेकाळी मांडलेली भूमिका प्रत्यक्षात साकारल्याबद्दल जनतेत त्यांच्याबद्दल मरणोपरांत हळहळ तर व्यक्त केली जात आहे शिवाय आदर वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *