भारताला जागतिक महासत्तेकडे नेणाऱ्या मोदींच्या पाठीशी उभे रहा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे आवाहन

By : Shankar Tadas


चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारताची जागतिक महासत्तेकडे घोडदौड सुरू आहे, जगातील शंभरपेक्षा अधिक देश भारताकडे आशेने बघत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पक आणि दूरदृष्टीमुळे हे शक्य होतंय हे सर्वांनी कोरोनाच्या काळात अनुभवलं आहे म्हणूनच , त्यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज केले. चंद्रपूर येथे आयोजित भाजपच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश,भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर, भाजपच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी, खासदार अशोक नेते, रामदास तडस, राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांच्यासह आमदार, माजी आमदार व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना नड्डाजी म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्याने सदैव भाजपची साथ दिली आहे. भविष्यातही साथ कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने विकास करतो आहे, हे त्यांनी स्पष्ट करत त्यांनी ब्रिटनने 200 वर्ष भारतावर राज्य केले, परंतु आज ब्रिटन भारताकडेच आशेने पाहतोय असे सांगितले. रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी या दोन्ही देशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्याचे धाडस केवळ नरेंद्रजी मोदी यांनीच दाखवले, असे जगत प्रकाश नड्डा गौरवाने म्हणाले. कोविड महामारीमध्ये भारताने शंभर पेक्षा अधिक देशांना लस पुरवली. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाला हा विकास दिसत नाही. पंतप्रधान मोदी विकासाचे तर काँग्रेस विनाशाचे राजकारण करत आहे, असे नड्डा म्हणाले.

*प्रत्येक निवडणूक भाजप जिंकणार : मुनगंटीवार*

आपल्या भाषणादरम्यान महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भाजपाने विजय संकल्प सभेसाठी चंद्रपूरची निवड नक्कीच विचारपूर्वक केली आहे; “आर ” फॉर रावणाचा वध करण्यासाठी “आर” फॉर राम लागतात; “के” फॉर कंसाचा वध करण्यासाठी “के” फॉर कृष्ण लागतात. अगदी त्याच पद्धतीने “सी” फॉर काँग्रेसचा पराभव करण्यासाठी “सी” फॉर चंद्रपूरची निवड करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री असताना नड्डाजी यांनी देशाला आयुष्यमान भारत ही योजना देत भारतीय नागरिकांचे आरोग्य जपले. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते देशाचे राजकीय आरोग्य जपत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याने नेहमीच भारतीय जनता पार्टीला साथ दिली आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाला आहे. अगदी त्याच पद्धतीने आगामी लोकसभा निवडणुकीतही चंद्रपूरची जनता भाजपला साथ देईल यासाठी मुनगंटीवार यांनी वज्रमूठ आवळली. मा.नड्डाजी यांच्या विजयाच्या संकल्पाना चंद्रपुरातून निश्चित साथ मिळेल असे ते म्हणाले.

भाजपच्या विजयाचा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी मुनगंटीवार यांनी माता महांकाली व भगवान अंचलेश्वराच्या चरणी प्रार्थना केली. चंद्रपूरच्या वैशिष्ट्या बाबत बोलताना ते म्हणाले की, वीर बाबुराव शेडमाके देशासाठी हुतात्मा झाले. भारत चीन युद्धाच्या वेळी सर्वाधिक सुवर्ण चंद्रपूरनेच देशाला दिले. भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही दीक्षाभूमी असून चंद्रपूर ने नेहमीच विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. गोळवलकर गुरुजी, सुदर्शनजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची नाळ ही चंद्रपूरशी जुळली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नव्याने उभारण्यात येत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा येथे लावण्यात आलेले प्रवेशद्वारही चंद्रपूरचेच आहे. त्यामुळे भाजपच्या विजयाच्या संकल्पना चंद्रपूर जिल्हा निश्चित आपले योगदान देईल, अशी ठाम ग्वाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराजजी अहिर यांनीही नड्डा व मोदीजी यांचे विशेष आभार व्यक्त केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *