दि ग्रेट बॅन्ड – बाजा

 

लोकदर्शन👉 राहुल खरात

आयु – विलास खरात. आटपाडी .
आटपाडी येथील महाराष्ट्र ब्रॉस बॅन्ड व भारत ब्रॉस बॅन्ड यांच्या संगीताच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ख्याती आहे. मंगलमय शुभ कार्यासाठी वाद्य वाजविणेची मागणी आले नंतर वाजंत्र्याचा ताफा घेऊन गावोगावी वाद्य वाजविणेसाठी जात असतात. प्रामुख्याने लग्न सराईत बॅन्डला भरपूर मागणी असते. सदरचे बॅन्ड लग्न सराई,गांवदेव,वरात, साखरपुडा, वाढदिवस, बारसे महापुरुषांच्या जयंत्या, सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यासाठी बॅन्डचे संगीत कलेचे वादनाचे कार्य अप्रतिम पणे करीत असतात त्यामुळे सदरचे बँड वाद्य वाजवणे या कलेत लोकप्रिय ठरलेले आहेत.
सदर महाराष्ट्र ब्रॉस बॅन्ड व भारत ब्रॉस ब्रॅडचे मालक “ ऐवाळे ” या आडनावांचे आहेत. त्यामुळे त्यांची माहिती थोडक्यात पाहू:- कर्नाटका राज्यातील रायबाग तालुक्यातील “ ऐवाळे ” या नांवाचे गांव आहे. या गावांमध्ये ऐवाळे नांवाला पाटील की होती. ऐवाळे या गांवाच्या नांवावरून ऐवळे हे आडनाव पडलेचे सांगितले जाते. “ ऐवाळे ” या गांवात महादेवाचे मंदिर आहे. सदरच्या मंदिराच्या शिला लेखावर “ ऐवाळे ” हे नाव कोरलेले आहे. त्यामुळे ऐवळे या नांवाचा उगम ऐवाळे गांवात असलेले सांगितले जाते. ऐवळे या नावाचे मूळ स्थान असलेचेही म्हटले जाते. ऐवळे हे लोक भक्ती भावाने महादेवाच्या मंदिरात वाजविणेचे काम पूर्वीच्या काळी करीत असत. त्यामध्ये मंदिरात पहाटे नगारा वाजविणे, आरती वेळी ढोल व सुर सनईचे वादन करीत असत असे ही सांगतात. त्यामुळे पूर्वीच्या काळापासूनच वाद्य वादनाची कला अंगीभूत होती असे दिसून येते.
जत येथील यल्लमा देवीस वाद्य वाजवणेचा मान आटपाडी येथील ऐवळे समाज्यास आहे. डफळे सरकारचे राजघराण्याचे बोने ( नैवेद्य ) वाजवीत नेहने देवीच्या पालखी वेळी पारंपारिक वाद्य वाजविणेचा मान ऐवळे यांना असले मुळे सदरच्या काळी डफळे सरकारनी शंभर एकर जमीन जत येथे देण्याचे मान्य केले होते. परंतु ऐवळे समाज्याने जमीन घेतली नाही. त्या बदल्यात पोटासाठी देवीला येणाऱ्या नैवेद्यावर हक्क सांगितला होता.
महाराष्ट्र राज्यात होलार समाज हा अनुसूचित जातीत येतो. सदरच्या समाज्याची आटपाडी भागात जनसंख्या बऱ्याच प्रमाणात दिसून येते. त्यामध्ये ऐवळे ,केंगार,जावीर,पारसे,ढोबळे, गुळीग ,हत्तेकर, हेगडे हा समाज प्रामाणिक,सहनशील, सोशिक व कष्टाळू आहे.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगां मध्ये गाथा नंबर २९७३ मध्ये होलार समाजाचा उल्लेख आला आहे. तसेच “गावगाडा” या पुस्तकाचे लेखक त्रि.ना.अत्रे यांच्या सन १९१५ साली लिहिलेल्या पुस्तकात असे म्हटले आहे की,- गावगाड्यातील आलुतेदारा मध्ये धंद्याला लागणाऱ्या जिनसा वरून जाती पडलेल्या दिसतात,असे म्हटलेले आहे. त्यामुळे होलार समाजाची उत्पत्ती पूर्वेच्या काळापासून असलेचे दिसून येते.
बडोदा संस्थांनचे महाराज सयाजी राजे गायकवाड यांनी आपल्या संस्थानात होलार बाजाला विशेष महत्व दिले होते. संस्थानात होलार बाजा वाजविला जात होता. त्यामध्ये सूर सनई, ढोल, ताशा, डफ या पारंपारिक वाद्याचा समावेश होता. तसेच अनेक लढाईत “रणवाद्य ” वाजवणारे होलार समाजाचे पथक असत. त्यामुळे लढाईत विजय झालेनंतर रणवाद्याचे पथक शौर्य गीत म्हणून जयवीर चा घोष करीत असत. जयवीर म्हणणारे जावीर झाले असेही सांगितले जाते. लढाईच्या बिकट प्रसंगी या पथकाला हातात शस्त्र सुद्धा घ्यावे लागत असत.
पूर्वीच्या काळी संस्थानिक व जमीनदार शेतीच्या कामासाठी शेतमजूर लावीत असत. शेतीचे क्षेत्र जास्त असलेमुळे शेतमजुरांना सुगीच्या काळात शेतात कामाचा कंटाळा येऊ नये शेतीची कामे लवकर व्हावीत. म्हणून शेतामध्ये होलार वादक डफाच्या माध्यमातून “भलरी” गीत म्हणून वाद्य वाजवीत असत. त्यामुळे शेतीच्या कामाचा उरक लवकर होत होता.डफाच्या वादनाने व गायनामुळे “भलरी” गीत शेतीच्या कामात महत्व पूर्ण भूमिका बजावित होते. नवपूर्ण नावीन्याच्या संगीतामुळे शेतकरी व शेतमजूर आनंदाने काम करीत असत.
पूर्वीच्या काळी गावगाड्यातील होलार समाज्यातील वाजंत्र्याचे लग्न सराईतील कामे संपले नंतर जोड धंदा म्हणून नवीन चप्पल बनवणे, गावोगावच्या बाजारात चप्पल विक्री करणे, जुन्या चपला (जोडे) सांधणे तसेच देवाच्या आरती, दुपारच्या मध्ये पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजवणे. काही भागात केरसुणी तयार करणे, काही भागात शेळ्या –मेंढ्या राखणे , मजुरी करणे इत्यादी व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत असत . होलार समाजाने कधीही लबाडी, शिंदळकी केलेली दिसून येत नाही. सर्वांशी प्रेमाने व प्रामाणिक राहत असत.
आटपाडीमध्ये जुन्या काळी पारंमपांरीक वाद्य ,सूर सनई,डफ, ढोल इत्यादी वाद्य वाजविणारे म्हणून ईश्वर ऐवळे , कृष्णा ऐवळे, पांडुरंग ऐवळे, एकनाथ ऐवळे, हे वादनाची उत्कृष्टपणे काम करीत असत तसेच सनई वादनात नामदेव ऐवळे अप्रतिम काम करीत असत.
परमपूज्य, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे १३ सदस्य मुंबई विधिमंडळावर सन १९३७ साली निवडून आलेले होते. त्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे आमदार म्हणून श्री. देवाप्पा होलार हे सुद्धा निवडून आले होते . त्या काळी स्वतंत्र मजूर पक्ष हा विधिमंडळात विरोधी पक्ष म्हणून काम करीत होता. अशी ही जुन्या काळातील माहिती आपणास सादर केलेली आहे.
आटपाडी येथील महाराष्ट्र ब्रॉस बॅन्ड चे संस्थापक दौलत बाबू ऐवळे होते. त्यांना वालचंदनगर येथील कारखान्यात मुकादमची नोकरी मिळाली होती. परंतु त्यांना वाद्य वादनाची आवड असल्यामुळे त्यांनी नोकरी नाकारली होती. थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात हे आटपाडी येथे सन १९३१-१९३२ साली लोकल शाळेत असताना दौलत बाबू ऐवळे हे वर्गमित्र होते. दौलत बाबू ऐवळे यांना दोन पत्नी होत्या. त्यांना एकूण ११ अपत्ये होती. त्यांनी आपल्या लहान मुलांना घरातील दरवाजाच्या कड्या वाजवून वाद्य शिकवीत होते. दौलत यांना पाच मुले होती. १)किसन २)परशुराम ३)विश्वनाथ ४)मुरलीधर ५) शिवाजी ही मुले मोठी झाले नंतर वाद्य वाजवण्याची कला शिकवण्यासाठी पुणे येथील प्रभात ब्रॉस बॅन्ड चे मालक श्री. बंडोपंत सोलापूरकर यांचे बॅन्ड कंपनीत वाद्य वाजवणे साठी भरती करणेत आले. प्रभात ब्रॉस बॅन्ड मध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केले. बॅन्ड च्या वाद्याची कला शिकून घेतली. किसन दौलत ऐवळे हे कुटुंबातील कर्ते असल्यामुळे त्यांनी आपल्या बंधूंना कल्पना दिली की आपण आटपाडी येथे स्वतंत्र ब्रॉस बॅन्ड ची स्थापना करून आपल्या आटपाडी भागात बॅन्ड ची कला सादर करूया. यावर सर्वांनी सहमती दर्शविली त्यानंतर आटपाडी या गावी येऊन वडिलांना कल्पना दिली. सर्वाच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ब्रॉस बॅन्ड ची स्थापना झाली. त्यानंतर आटपाडी व आजूबाजूच्या गावातून बॅन्ड बाजा वाजू लागला. व प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली अनेक भागात बॅन्ड च्या संगीताच्या मैफिली होऊ लागल्या.
श्रीमंत बाबासाहेब देशमुख सभापती असताना पंचायत समिती कडून बॅन्ड पथकाची वाद्य मंजूर करून दिली. १) ट्रॉम्पेट , ढोल ,पडघम (ड्रम) मराकस (गोळे ) हे वाद्याचे सामान देण्यात आले. त्यानंतर होलार समाजातील तरुणांना वादन करण्याचे काम किसन दौलत ऐवळे व त्यांच्या बंधूनी केले. त्यामुळे आटपाडी च्या महाराष्ट्र ब्रॉस बॅन्ड ची ख्याती अनेक जिल्ह्यात पसरली होती. बॅन्डला मागणी भरपूर येत होती. महाराष्ट्र ब्रॉस बॅन्ड तर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त च्या झेंडावंदनच्या कार्यक्रमात बॅन्ड ची गाणी सादर करून दरवर्षी मानवंदना देत होते.
सध्या महाराष्ट्र ब्रॉस बॅन्डच्या तिसऱ्या पिडीची जबाबदारी श्री.सुनील मुरलीधर ऐवळे ,भारत मुरलीधर ऐवळे, समाधान किसन ऐवळे , रणजीत मुरलीधर ऐवळे , संजय विश्वनाथ ऐवळे, सचिन शिवाजी ऐवळे, चंद्रकांत शिवाजी ऐवळे, राजेंद्र विश्वनाथ ऐवळे हे वाद्य वाजविणेचे काम करतात. विजय विश्वनाथ ऐवळे हे हे कि बोर्ड उत्कृष्ठ पद्धतीने वाजवीत होते. सन १९८४ सालापासून सुनील ऐवळे हे ब्रॉस बॅन्ड मध्ये लेडीज -जेंट्स आवाजात गायनाचे काम करीत असत. नंतर ते “सॅक्सोफोन ” या वाद्याकडे वळले. सॅक्सोफोन या वाद्याने सुनील ऐवळे यांची ओळख महाराष्ट्र भर झाली. सुनील यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे संगीताचे कर्णमधुर सुराचे लावण्य काय असते हे दाखवून दिले. सन २०१४ साली कलेश्वर मंदिरात श्री. व्ही.एम देशमुख सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सुनील ऐवळे यांनी सॅक्सोफोन या वाद्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध केले होते. सदर कार्यक्रमास श्री. राजीव खांडेकर संपादक ए.बी.पी माझा मुंबई हे आले होते. ते भारावून गेले होते. सॅक्सोफोन वरून गीते सादर केली होती .संगीत मैफिलीचा उत्कृष्ट नजारा सादर झाला होता. त्यामुळे ए.बी.पी माझा या मराठी चॅनलवर “दिवाळी पहाट” या कार्यक्रमात सुनील ऐवळे ला सॅक्सोफोन वरून गाण्याची संधी दिली होती. या संधीचे सोने सुनील ऐवळे यांनी करून आटपाडी महाराष्ट्र ब्रॉस बॅन्डचे नांव लौकिक केले आहे.
सध्या महाराष्ट्र ब्रॉस बॅन्ड मध्ये ३० लोकांचा संच, वाद्य वाजविणे साठी कार्यान्वित आहे. ब्रँडची आधुनिक पद्धतीने गाडी सजवलेली आहे. वाद्यामध्ये सॅक्सोफोन,क्लरोनेट, ट्रामपेट,एफोनिम, थाप, ढोल, बेस, ढोल ड्रम, मराकस इत्यादी आधुनिक वाद्याने लग्न सराई,गांवदेव, वरात, साखरपुडा, वाढदिवस, बारसे ,थोर महापुरुषांच्या जयंत्या , आणि सांस्कृतिक कार्यक्रम बॅन्ड च्या माध्यमातून मनोरंजन व कला सादर करीत आहेत. बॅन्डच्या माध्यमातून केलेल्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत श्री. सुनील मुरलीधर ऐवळे यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना अनेक ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलेले आहे.
भारत ब्रॉस बॅन्ड- आटपाडी चे संस्थापक निवृत्ती मारुती ऐवळे व केशव बापू ऐवळे यांनी सदर बॅन्डची निर्मिती केलेली आहे . निवृत्ती मारुती ऐवळे यांची मुले १)श्रावण २)नंदकुमार ३) किसन ४) काशिनाथ हे सुद्धा पुणे येथील प्रभात ब्रॉस बॅन्ड मध्ये वाद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते. त्यांनी सुद्धा अनेक वर्षे प्रभात ब्रॉस बॅन्ड मध्ये काम केलेले आहे. त्यावेळी नंदकुमार निवृत्ती ऐवळे हे पुणे आकाशवाणी केंद्रावर ट्रामपेट वाद्य वाजवीत होते. शास्त्रीय संगीतातील अनेक वाद्याची कला शिकून घेतली होती. त्यामुळे पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये रेडिओस्टार म्हणून मान्यता मिळाली होती.
नंदकुमार निवृत्ती ऐवळे हे आपल्या बंधूसह प्रभात ब्रॉस बॅन्ड सोडून आपल्या आटपाडी या गावी आल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांसह सर्वां बरोबर चर्चा विचार विनिमय करून सर्वांच्या विचारांने आटपाडी येथे भारत बॅन्ड ची स्थापना केली. त्यांनी आटपाडीसह अनेक भागात लग्न कार्यासह शुभ कार्यात आपल्या बॅन्डच्या गाण्याची खूप प्रसिद्धी मिळवली. नंदकुमार हे ट्रामपेट वाजवण्यात वाकबगार झालेले होते. रेडिओस्टार असलेमुळे भारत बॅन्ड हा वाद्याचा ताफा नावारूपाला आणला. संगीताच्या कलेतील अनेक आविष्कार बॅन्डच्या माध्यमातून सप्तसुराचा खजिना लोकांसमोर सादर करून बॅन्डची कला अनेक जिल्ह्यात पोहोचवली. तसेच केशव बापू ऐवळे हे काळी कलाट वाजविणेत तरबेज होते. त्यांच्याबरोबर श्रावण निवृत्ती ऐवळे , विठ्ठल शंभू ऐवळे , धोंडीराम ऐवळे , महादेव लोभा ऐवळे हे भारत बॅन्ड मध्ये विविध वाद्य वाजवीत होते. तसेच रामचंद्र हरिबा ऐवळे हे थाप ढोलाचे वादन चांगल्या पद्धतीने करत असत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भारत ब्रॉस बॅन्डला मागणी होत आहे.
श्री सिद्धनाथ या देवाच्या यात्रेच्या वेळी खरसुंडी येथे आटपाडीचे ऐवळे हे बॅन्ड स्पर्धेचे मानाचे मानकरी होते. गावोगावच्या होलार समाज्यातील वाजंत्रीच्या वाद्याचे कलेचे निरीक्षण व परीक्षण करून त्यांचा सन्मान करीत असत.
भारत ब्रॉस बॅन्डची सुद्धा तिसरी पिढी वाद्य वाजविणेचेच काम करीत आहे. आधुनिक वाद्ये व आधुनिक पद्धतीने सजविलेले वहान त्यांच्या ताफ्यात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने श्री. शेखर नंदकुमार ऐवळे, नितीन किसन ऐवळे, महेश किसन ऐवळे, प्रवीण काशिनाथ ऐवळे, जगन्नाथ रामचंद्र ऐवळे हे भारत ब्रॉस ब्रँड चा रथ पुढे नेहत आहेत. शेखर हा ऑरगन वाजविणे ,लेडीज- जेंट्स आवाजात बॅन्ड पथकात गाणे गाणे. महेश ट्रामपेट वाजवितो. प्रवीण ड्रम वाजवितो. जगन्नाथ ढोल वादनाचे काम करतो. भारत बॅन्ड मध्ये तिसऱ्या पिढीचे नेतृत्व नितीन व शेखर करीत आहेत. त्यामुळे भारत ब्रॉस बॅन्डचे नाव सुद्धा संगीत क्षेत्रात अग्रेसर आहे.
आटपाडी मधील महाराष्ट्र ब्रॉस बॅन्ड व भारत ब्रॉस बॅन्ड हे गावच्या दृष्टीने दोन अनमोल रत्ने आहेत. गांवाचे नाव बॅन्डच्या क्षेत्रात मोठे केले आहे. महाराष्ट्रातील व कर्नाटकातील अनेक जिल्ह्यात बॅन्डची कला सदर करणे साठी अभिमानाने बोलावतात शुभकार्यात बॅन्ड वाजवण्यात शिवाय मंगल कार्यास शोभा येत नाही. संगीत, वाद्य वाजविणेची कला ही पुरातन काळापासून आहे. ती कला जोपासण्याचे काम महाराष्ट्र ब्रॉस बॅन्ड व भारत ब्रॉस बॅन्ड प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. त्याच्या संगीत कलेस मानाचा मुजरा :- तसेच रणजीत ऐवळे, आनंदा ऐवळे, रमेश जावीर (खरसुंडी),सुखदेव गुळीक यांनी मौलाची माहिती दिली त्यांचे ही आभार तसेच पत्रकार सादिक खाटिक यांनाही धन्यवाद .
कळावे,

आपलाच
आयु, विलास खरात
सचिव
साहित्य रत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी.
जि.सांगली. महाराष्ट्र मो.नं.९२८४०७३२७७

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *