लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर – आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकारातून दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब गडचांदूर व भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचांदूर येथे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबाल स्पर्धेचे आमदार चषक नुकतेच पार पडले.
या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक जी.आर.सी. कामठी या संघाने, द्वितीय क्रमांक महाराष्ट्र स्पायकर्स या संघाने तर तृतीय क्रमांक विशाखापट्टनम या संघाने पटकाविला. महिला गटात प्रथम क्रमांक पंजाब संघाने, द्वितीय क्रमांक पुणे संघाने, तृतीय क्रमांक जबलपूर संघाने पटकाविला. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आमदार चषक – २०२२ चे उद्घाटन करण्यात आले होते. महिला गटात देशातील पुणे, जबलपुर, आग्रा, पंजाब, गुजरात, चंद्रपूर, यवतमाळ, हैदराबाद, दिल्ली येथील संघांनी सहभाग घेतला होता. तर पुरुष गटात देशातील कामठी, पंजाब, यवतमाळ, नागपूर, विजयवाडा, विशाखापट्टनम, महाराष्ट्र स्पायकर, हैदराबाद येथील संघांनी सहभाग घेतला होता.
बक्षीस वितरण गडचांदूर येथील नगराध्यक्ष सविता टेकाम, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, नगरसेवक राहुल उमरे, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष विनोद तराळे, सुनिल बोरीकर, सुधीर पिंपळकर, विक्की मुन, अनिल पिंपळकर, दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब व भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्थेच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लबचे सचिव विकी मून यांनी केले. यशस्वितेकरिता सर्व सदस्यांनी सहकार्य केले.