दुबई गाजवलेला मराठी उद्योजक! याचा गरीबीतून लक्षाधीश होण्यापर्यंत प्रवास खूप काही शिकवून जातो!

*लोकदर्शन👉संकलन – सुरेखा नेसरीकर.
कोल्हापूर. 9028261973.
5 मार्च 2022.

‘मसाल्यांचा राजा’ धनंजय दातार म्हणजे एका गरीब मुलाचा दुबईतील अल अदिलमधील लक्षाधीश बनण्यापर्यंतचा प्रवास.

एकेकाळी पायात चप्पलही नसलेला हा मुलगा आज चालवतोय स्वतःची रोल्स-रॉईस. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता.

शाळेत जात असताना लहानपणी पायात चप्पल नाही, पाऊस आला तर छत्री नाही, छत्रीऐवजी ज्यूटची बॅग डोक्यावर धरून जात असे. तो मुलगा आज २ मिलिअनच्या रोल्स रॉईसचा मालक आहे. ही एका भारतीय आणि मराठी व्यावसायिकाच्या यशाची कहाणी आहे.

धनंजय दातार यांना आज सगळे ‘मसाला किंग’ किंवा ‘किंग ऑफ स्पाईस’ या नावाने ओळखतात. धनंजय दातार हे आज युएइमधील अल अदील ट्रेडींगचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

पण एकेकाळी या माणसाचे आयुष्य खूप खडतर होते. कारण त्यांचे कुटुंब फार गरीब होते. धनंजय दातार ते दिवस अजूनही विसरलेले नाहीत. त्यांना तर अजून त्या गोष्टी ताज्याच वाटत आहेत आणि लख्ख डोळ्यांसमोर दिसतात.

आज मसाल्याच्या व्यापारात सर्वोच्चस्थानी असलेल्या धनंजय दातारांचा हा प्रवास आव्हानांनी भरलेला होता. तरीही त्यांनी त्या आव्हानांवर मात करत आपल्या या मसाल्याच्या व्यवसायात जम बसवला.

परदेशात देखील लोकांना आपल्या देशातले मसाले मिळावेत आणि त्यांचं रोजचं जेवण आपल्या पूर्वीच्याच चवीचं व्हावं यासाठी त्यांनी अफाट प्रयत्न करून हा मसाला व्यवसाय उभा केला.

धनंजय दातार आज २ मिलिअनची बेसपॉक रोल्स-रॉयस फॅन्टम ही जगातली महागडी गाडी भेटीत देऊ शकतात. या मॉडेलची गाडी जगात केवळ १७ लोकांकडे आहे.

त्यांनी आपल्या अल अदिल ट्रेडिंगच्या २५व्या वर्धापनदिनाचा समारंभ रॉयल जेट एअरवेज बोईंग ७३७ मध्ये साजरा केला, तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला वंदना दातार यांना ह्या गाडीची प्रतिकात्मक चावी भेट केली.

मुलाखतीत दातार म्हणतात, की हा सगळा नशीबाचा खेळ आहे, ईश्वराची कृपा आहे आणि मेहनतीचे फळ आहे. या तीन गोष्टींमुळेच आपण आपल्या कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढू शकलो आहोत.

या चमत्काराची सुरूवात झाली ती युनायटेड अरब अमिरातीतून. ते म्हणतात, “मी या भूमीवर पाय ठेवला तेव्हाच माझे नशीब पालटले.”

आज अल अदिल ट्रेडींग हा एक नावाजलेला ब्रॅन्ड आहे. या कंपनीने आपल्या ९०००हून अधिक उत्पादनांसह सन २०१८ मध्ये वार्षिक ७५० दशलक्षची उलाढाल नोंदवलेली आहे.

आजघडीला त्यांची युएई, जीसीसी आणि भारत या देशात मिळून ३९ रिटेल स्टोअर्स, मॅन्युफॅक्चरींग आणि पॅकेजिंग युनिट्स आहेत. त्यांची वैयक्तिक मालमत्ता ही १ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

बालपण –
दातार यांचा भूतकाळ म्हणजेच त्यांचं बालपण हे फार हलाखीतलं होतं. तेव्हा एकदम विरुद्ध चित्र होतं.

त्यांचे वडील महादेव दातार हे इंडियन एअर फोर्समध्ये सार्जंट होते. त्यांची नेमणूक भारतातल्या विविध भागात होत असे.

सततच्या बदल्यांमुळे त्यांनी आपल्या मुलाला, धनंजयला अमरावतीला आपल्या आईच्या आईकडे म्हणजेच आजीकडे अमरावतीला ठेवले. तेव्हा धनंजय यांचे वय होते ८ वर्षे.

त्यांची ही आजी पैशाने गरीब होती. पण फार स्वाभिमानी होती. धनंजय यांच्या वडिलांनी त्यांना धनंजयच्या खर्चाचे पैसे देऊ केले, परंतु त्यांनी ते नाकारले. त्यामुळे धनंजय यांना तिच्याकडे तिच्याच परिस्थितीप्रमाणे राहावे लागले.

तिथे ते एका लहानशा शाळेत शिकले. तेव्हा त्यांच्याजवळ एकच युनिफॉर्म असायचा आणि तो त्यांची आजी शाळेतून आल्यावर रोज धुवून ठेवत असे.

त्या युनिफॉर्मची बटनेही तुटलेली असत. आणि त्या जागी सेफ्टी पिना लावलेल्या असत. धनंजयना चप्पल घेऊन देण्यास देखील तिच्यापाशी पैसे नसत. म्हणून मग धनंजय रोज शाळेत अनवाणी जात असत.

तेव्हा शर्टाला लावलेल्या पिनांचा दुहेरी उपयोग होत असे. एकतर त्या पिना बटनांचे काम करत. आणि रोज शाळेत विना चपलेने जावे लागत असल्यामुळे जवळपास रोजच पायात काटे रुतत. ते काटे काढण्यासाठीही त्या पिनांचा उपयोग होई.

त्याचप्रमाणे पावसाळ्यात रेनकोट किंवा छत्री खरेदी करण्यासाठीही आजीजवळ पैसे नसत. त्यामुळे मग ते ज्युटची एक बॅग मधून कापून आपल्या डोक्यावर इरलीप्रमाणे घेत असत.

खाण्यापिण्याचेही हालच –
जे हाल कपडे आणि इतर वस्तुंबाबत होते, तेच हाल जेवण्याखाण्याच्या बाबतीतही होते. सकाळी नाश्ता बिश्ता हा प्रकार नव्हता. सकाळी आजी आणि नातू दोघेही कपभर चहा पिऊन घेत.

त्यानंतर त्यांची आजी त्यांना दोन भाकरी बांधून देई. रात्रीही जेवणात भाकरीच. मात्र रात्री त्याबरोबर तुरीची डाळ असे. मात्र त्या डाळीत टाकायला मसालेही नसत.

ते म्हणतात, की माझ्या आजीपाशी बाजारातून मसाले आणायलाही पैसे नसत. ती रात्री थोडंसं दही लावून ठेवत असे. मात्र त्या दह्याबरोबर खायला घरात साखरही नसे.

आपले वडील निवृत्त होऊन मुंबईला कायमसाठी स्थायिक होईपर्यंत चार वर्षे त्यांनी आपल्या आजीबरोबर काढली.

निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी धनंजय दातार यांच्या वडिलांनी, महादेव दातार यांनी दुबईला एका स्टोअरमध्ये मॅनेजरची नोकरी घेतली.

तिथे जवळपास सात वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी धनंजयला मुंबईहून आपल्यापाशी बोलावून घेतले आणि आपण उघडलेल्या एका छोट्या दुकानात आपल्या मदतीला ठेवले.

तेव्हा धनंजय दातारांचे वय होते २० वर्षे आणि ते साल होतं १९८४. या काळात ते मुंबईत असताना कलिना परिसरात राहत होते. आणि त्यांच्या त्या परिसरातले बरेच लोक दुबईत नोकरीला होते.

ते म्हणतात, हे दुबईत नोकरी करणारे लोक जेव्हा मुंबईत परत येत तेव्हा त्यांच्यात बराच फरक झालेला मला दिसे.

त्यांच्या अंगावर कपडे नवीन फॅशनचे आलेले असत. बोलण्यात रुबाब दिसे. गळ्यात, हातात सोन्याचे दागिने असत. मनगटावर महागडी घड्याळं असत. अंगावर भारीतले परफ्यूम्स शिंपडलेले असे.

त्यामुळे जेव्हा मला बाबांनी दुबईला त्यांच्यासोबत राहायला बोलावले तेव्हा मला खूप आनंद झाला आणि मी ताबडतोब इकडे आलो.

तोपर्यंत त्यांच्या बाबांनी, महादेव दातार यांनी दुबईच्या ऍस्टोरिया हॉटेलपाशी अल अदिल नावाचे एक १५० स्क्वेअर फुटाच्या छोट्या गाळ्यात किराणा मालाचे जनरल स्टोअर सुरू केले होते. ते साल होते १९८४.

त्यानंतच्या दहा वर्षाच्या काळातच त्यांनी आपलं अजून एक स्टोअर अबु धाबी इथं उघडलं आणि नंतरच्याच वर्षात अजून एक शारजामध्ये. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही आणि एक नवा यशाचा इतिहास रचला.

व्यवसाय वाढवण्याच्या कल्पना…
तेव्हा म्हणजे ऐंशीच्या दशकात अरब देशांमध्ये किराणा मालाची दुकाने फार कमी होती आणि जी होती ती देखील फार छोटी छोटी अशी असत. आणि त्यातील बहुतेक सगळीच दुकाने भारतातून आलेल्या लोकांची असत.

या दुकानांमध्ये भारतीयांना लागणारे सगळे मसाले आणि इतर वस्तू मिळत नसत. भारत हा एक महाकाय देश असल्याने आणि इथं प्रत्येक राज्यातील लोकांना लागणारे मसाले हे विविध प्रकारचे, भिन्न असल्याने, ते सगळेच प्रकार तिथे मिळत नसत.

तिथे आलेले भारतीय मात्र भारतातल्या विविध राज्यातले असल्याने त्यांना खास आपल्या राज्यातील, आपल्या प्रदेशातील मसाल्यांची आस असे.

म्हणून धनंजय दातार यांच्या वडिलांनी, महादेव दातार यांनी विचार केला, की भारतातील सर्व भागातील विशिष्ट मसाले एकाच जागी मिळतील असं दुकान टाकायला हवं. आणि त्यांच्या या कल्पनेतूनच अल अदिल या स्टोअरचा जन्म झाला.

आज या अल अदिल ट्रेडींगची स्वतःची अशी जवळपास ९००० उत्पादने आहेत. उदा. त्यांच्या दुकानात तमिळनाडूत मिळणारा अप्पालम् नावाचा पदार्थही मिळतो आणि तिथले प्रसिद्ध ७७७ लोणचेही मिळते आणि तिथले इतर पदार्थही मिळतात.

तुरडाळ लातूरहून मागवली जाते आणि उडीद डाळ, चणा डाळ इत्यादी जळगावहून. तर मसूर डाळ इंदूरहून जाते.

नावाचा महिमा –
जेव्हा आपल्या कंपनीचे नाव रजिस्टर करण्याची वेळ आली, तेव्हा त्या कंपनीच्या नावाबद्दल त्यांच्या मनात काही कल्पना होत्या. त्यांना भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा खूप आवडीचा आहे. परंतु ते नाव नाकारण्यात आले.
म्हणून मग त्यांनी ‘ऑल इंडिया स्पायसेस’ हे नाव घेतले पण तेही अधिकाऱ्यांकडून नाकारण्यात आले.

शेवटी त्यांच्या रजिस्ट्रार कार्यालयातील एका अधिकाऱ्याने आपल्या मुलाचे अदिल हे नाव घेण्यास सुचवले. सुरुवातील धनंजय यांना ते नाव घेणे फार चांगले वाटले नाही.

मात्र त्यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला, की ज्या देशात राहतो त्या देशाच्या लोकांना प्रिय वाटेल ते करावे.

मग अदिल या शब्दाचा अर्थ त्यांनी शोधला. त्याचा अर्थ होता चांगला किंवा प्रामाणिक. तेव्हा ते नाव त्यांना आवडले, कारण त्यांना देखील आपला व्यवसाय प्रामाणिकपणेच करायचा होता.

आज मात्र हे नाव जगभरात प्रसिद्ध झाले. त्याच्या शाखा अरब देशांतच नव्हे तर जीसीसी आणि भारतातही प्रसिद्ध झाल्या.

मेहनत आणि जिद्द –
दातार दिवसाला सोळा तास काम करतात. सुरुवातीच्या काळात दुकानात झाडू मारण्यापासून सामान चाळणे, भरणे इत्यादी सगळी कामे त्यांनी स्वतः केली.

सुरुवातीच्या काळात दुकानाला लागणारे भांडवल त्यांच्या आईने आपले सगळे, अगदी मंगळसूत्रापासूनचे दागिने विकून उभे केले.

त्यावेळी बहुतेक व्यवसाय उधारीवर चालत होता. अनेकदा लोक पैसे बुडवत. अशा काळात त्यांची आई त्यांच्यामागे भक्कमपणे उभी राहिली. तिने धीर दिला. आव्हान दिले.

अरब देशांतील युद्धाचा काळ आणि बदल –

या युद्धाच्या दरम्यान किराणा मालाची मागणी त्या देशांमध्ये प्रचंड वाढली. लोक घाबरून अन्नधान्याचा साठा करू लागले. त्याचा फायदा दातारांच्या दुकानाला झाला.

यशाचा मंत्र –
आपल्या यशाबद्दल बोलताना ते म्हणतात, “यशस्वी लोक काही जगावेगळं काम करत नसतात. मात्र ते जे काम करतात ते वेगळ्या पद्धतीने करतात एवढंच.”

व्यवसायाचा सोपा मंत्र हाच आहे, की लोकांना काय हवे ते ओळखा, आणि तेच त्यांना देण्याचा प्रयत्न करा. आम्ही ज्यावेळी इथं या धंद्यात उतरलो तेव्हा आमच्याशिवाय दुसरं कोणीच या व्यवसायात नव्हतं. त्याचाही फायदा आम्हाला झाला.

व्यवसाय करताना आपल्या योजनेवर विश्वास ठेवा. येणारी प्रत्येक संधी उचला. “हे नाही जमलं तर ते” असा पर्यायच ठेवू नका. मेहनतीला मागे फिरू नका.

आपल्या ग्राहकाला प्राधान्य द्या. त्यांच्या फिडबॅकला महत्त्व द्या. त्यातूनच व्यवसाय वाढवण्याच्या कल्पना मिळतात. बँक इत्यादींची कर्जे वेळच्या वेळी पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. त्यामुळे बँका तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी अधिकाधिक मदत करतील.

धनंजय दातार यांनी दिलेले हे मंत्र प्रत्येक व्यावसायिकाने लक्षात घेतले, तर प्रत्येकजण यशस्वी बनू शकतो.

* मी सुरेखा नेसरीकर. कोल्हापूर. 9028261973.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *