फलज्योतिष थोतांड..!!

फलज्योतिषाचा अभ्यास नसताना त्‍याला विरोध करणं योग्य नव्हे, असं काही जणांच मत असत. त्‍यासाठी फक्त एकच उदाहरण देतो.
विवाह करण्यासाठी समाजात महत्‍वपूर्ण ठरणारी पत्रिका फलज्योतिषी जुळवतात. त्‍यासाठी ३६ गुणांची परिक्षा असते. त्‍यापैकी आठरा गुण पडले की पासिंग. पन्नास टक्क्याला पासींग. विद्यापीठ परिक्षेला पस्तीस टक्कयाला पासिंग असतं. ही परिक्षा High Qulaity ची असल्यामुळे बहुतेक पन्नास टक्क्याला पसिंग असावं. परिक्षा देण्यासाठी मुलगा अथवा मुलीला लेखी अथवा तोंडी परिक्षा द्यावी लागत नाही. पत्रिका दिली की झालं. सदर परिक्षा आठ विभागामध्ये विभागलेली आहे. त्‍यापैकी फक्त पहिल्या ‘वर्णगुण’ विभागाच स्पष्टीकरण देतो. वर्णगुणाच टेबल पंचांगामध्ये अधिकृतपणे दिलेलं आहे…
मुलगी मुलगा
विप्र क्षत्रिय वैश्य शुद्र
विप्र १ ० ० ०
क्षत्रिय १ १ ० ०
वैश्य १ १ ० ०
शुद्र १ १ १ १

हे टेबल काय सांगतं. आज आपण मोठया अभिमानाने सांगतो की, वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था नष्ट झालेली आहे. असं जे म्हणतात त्‍यांनी हे टेबल बारकाईन पहावं. सदर टेबलनुसार मुलामुलीची विभागणी चार वर्णात करण्यात आलेली आहे. विप्र, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र. याचा अर्थ आजही मुलामुलीला आपण माणूस समजत नाही. या विभागणीचा विप्रला अपमान वाटण्याचा प्रश्नच नाही. क्षत्रियाला थोडस वाईट वाटेल पण शुद्राला वाईट वाटेल की नाही? याचा विचार करणार आहोत की नाही. खरी गंमत पुढे आहे. विप्र म्हणजे ब्राम्हण! असा उल्लेख का केला नाही हे सुज्ञांला सांगायला लागु नये अस मला वाटतं. कोष्टक पाहिल्यानंतर फारच अवघड आहे, असं वाटण्याची शक्यता आहे. कोष्टक सोपं आहे, पण कोष्टकामागे फार मोठी सामाजिक विषमता दडलेली आहे. सर्व वर्णातील महिलांना आणि शुद्राला तुच्छ लेखणारा हा गुणांचा प्रकार आहे. कोष्टकाचे विश्‍लेषण केल्यानंतर असं लक्षात येतं की,
•वरच्या वर्णातील मुलाने त्याच्या अथवा खालच्या वर्णातील मुलीशी लग्न केल्यास एक गुण.
•वरच्या वर्णातील मुलीने खालच्या वर्णातील मुलाशी लग्न केल्यास मात्र शून्य गुण.
•शुद्र मुलाला दुसरा कोणताचा चॉईस ठेवलेला नाही
प्रत्येक वर्णातील मुलीला कमी लेखण्याचा हा प्रकार वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था घट्ट करण्याचेच काम करतो. पंचांगकर्त्याच्या अधिकारामुळे वरच्या जातितील मुलाने खालच्या जातितील मुलीशी लग्न केले तर चालते. पण वरच्या जातीतील मुलीने खालच्या जातितील मुलाशी लग्न केले तर चालत नाही. आर्ची आणि परशाचा सैराट! सर्वसामान्यांच्या मनामध्ये सैराटने जे घर करून ठेवलेलं आहे ते केवळ या एका गुणाच्या कोष्टकाने. लिखीत साहित्य कायमस्वरूपी समाजमन कसं बधीर करून टाकतं, याचा हा उत्त्म नमुना आहे. मुलीने केलं तर ‘खानदान की इज्जत पूरी मिट्टीमें मिल जाती है.’ हा विरोधाभास वाटत नाही का? पुरूषी अहंकार बाजूला ठेवून विचार केला, तरच असे प्रश्न पडू शकतील. पुरूषांमध्येही ब्राह्मण मुलाला उच्चस्थानी तर शूद्राला सगळ्यात तळाला ठेवण्यात आलेले आहे, हे जातीव्यवस्थेच समर्थन नव्हे का? पंचांग हे वर्णवर्चस्ववादी, जातीयवादी आणि पुरूषप्रधान असल्याचा हा एक नमुना. आजही लग्न ठरवताना गुणमिलनाचा आग्रह धरणार असू, तर आपण जातिव्यवस्थेचे, वर्णवर्चस्वाचे आणि स्त्री-पुरूष असमानतेचे समर्थन करतो, असा त्याचा अर्थ होतो. आज एकविसाव्या शतकामध्ये जात, वर्ण नष्ट झालेले आहेत, असे एकीकडे आवर्जून सांगायचे आणि दुसरीकडे संस्कृतिच्या नावाखाली ते घट्ट करायचे, असे दुटप्पी वर्तन करणे योग्य नव्हे. किंबहुना ते संविधान आणि लोकशाही विरोधी आहे. ज्योतिषांच्या सर्व संकल्पनांचा फोलपणा भौतिकशास्त्राचे आणि खगोलशास्त्राचे विद्यादान करणारे आपणच करू शकतो. ज्येतिषांच्या बरोबर वाद संवाद करायला मी केव्हांही आणि कोठेही यायला तयार आहे. अथवा एखाद्या ज्योतिषाची हमी घेतल्यास आम्ही नियोजन करतो.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *