

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕*राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांसह घेतली ऑनलाईन बैठक*
*अधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांसह लवकरच पाहणी करणार*
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी बांधकाम करणे, दुभाजक बसविणे, आकर्षक पथदिव्यांची व्यवस्था करणे, सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने पक्क्या नालीचे बांधकाम करणे या सर्व बाबींसह कोठारी गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा भाग आकर्षक व रूंद होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व आपण स्वतः लोकप्रतिनिधी तसेच गावक-यांसह लवकरच पाहणी व चर्चा करून योग्य उपाययोजना करू, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक १५ जून रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कोठारी गावातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाबाबत नागरिकांच्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतली. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे विभागीय अभियंता श्री. जैस्वाल, विनोद मिश्रा,भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली बुध्दलवार, सोमेश्वर पदमगिरीवार, सरपंच मोरेश्वर लोहे, विनोद बुटले, संतोष लोनगाडगे, राजू बुध्दलवार, रमेश पिपरे, श्री. शुभम बुरेवार आदींची प्रामुख्यान उपस्थित होती.
या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांच्या मागणीनुसार सदर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा आढावा घेतला. येनबोडी या गावाजवळ जुने सौंदर्यीकरण काढल्यामुळे जो खड्डा तयार झाला आहे तो त्वरीत बुजविण्यात यावा व पळसगांव ग्राम पंचायतीच्या गेटचे नव्याने बांधकाम करण्यात यावे अशा सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. नागरिकांच्या मागणीनुसार बांधकामात काही बदल करावयाचे असल्यास स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करावे यासाठी निधी उपलब्ध होण्याबाबत आपण स्वतः केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करू, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. या परिसरातील वळण रस्त्यावर होणारे अपघात लक्षात घेता उपाययोजना करण्याची आवश्यकता आ. मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली. त्याचप्रमाणे बस स्थानकानजीक शौचालय तथा मुत्रीघर आमदार निधीच्या माध्यमातुन बांधण्यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. गोंडपिपरीच्या धर्तीवर कोठारी येथील रस्ता आकर्षक व्हावा यादृष्टीने लवकरच आ. सुधीर मुनगंटीवार, अधिकारी व गावक-यांसह पाहणी दौरा करणार आहेत. बैठकीचे प्रस्ताविक व समारोप देवराव भोंगळे यांनी केला.