*ख्यातनाम चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या आर्ट गॅलरीतील लाखोंची कलाकृती आगीच्या भक्ष्यस्थानी*

By : Rajendra mardane

*वरोरा* : ख्यातनाम चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या स्थानिक सरदार पटेल वॉर्डच्या गजानन नगर परिसरातील राहत्या घरात उभारलेल्या आर्ट गॅलरीला आग लागल्याने शुक्रवारी रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान लाखो रुपये किमतीच्या कलाकृती आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने ठक परिवाराला तीव्र मानसिक धक्का बसला असून कलाप्रेमींचे मन हेलावून गेले आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असलेले प्रल्हाद ठक यांनी त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्यावर आर्ट गॅलरी उभारली आहे. त्यात त्यांनी कलात्मक दृष्टीकोन बाळगून व अपार कष्ट घेऊन विविध कलाकृती तसेच दुर्मिळ वस्तूंचा संग्रह दिमाखदार पद्धतीने सजवला होता. शुक्रवारी रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास प्रल्हाद ठक आपल्या घरातच होते तेव्हा अचानक त्यांना कडप्पा फुटल्याचा जोरदार आवाज ऐकू आला. आर्ट गॅलरीमध्ये चोर घुसल्याचा अंदाज वर्तवून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ते खाली आले असता कुलूप लागलेच होते. तितक्यात पुन्हा जोरदार आवाज आल्याने खिडकीजवळून डोकावल्यावर धूर निघताना दिसला. त्यांनी वीज पुरवठा खंडित करून शेजार्‍यांना मदतीसाठी पाचारण करीत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
जळालेल्या आर्ट गॅलरीत ठक यांनी स्वत: रेखाटलेली चित्रे, तयार केलेली शिल्पे, दुर्मिळ चित्रांचा संग्रह, कॅनव्हास पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग साहित्य, होल्डर पेंटिंग, रेकॉर्ड, परमवीर चक्र विजेत्यांची ब्लड पेंटिंग अशा अनेक कलाकृती होत्या, त्याचे मूल्यांकन पैशात होऊ शकत नाही.
दुकाने कारखान्यात झालेल्या नुकसानीचा आकडा काढता येतो मात्र कलाकृती व दुर्मिळ संग्रहित वस्तूंची किंमत कशी ठरवणार? त्याचे मोल कसे मोजणार? असा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे रक्ताने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी स्वातंत्र दिन, प्रजासत्ताक दिनी ठक आर्ट गॅलरीमध्ये लोकांची एकच गर्दी असते. त्यांच्या चित्रांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या प्रदर्शनात मेडिटेशन वर आधारित पेंटिंग ९० हजार रुपयाला विकली गेली होती. अशा अनेक पेंटिंग्ज त्यांनी रेखाटल्या आहेत.
त्यांच्या घरातील कला दालनात त्यांनी स्वरक्ताने काढलेल्या १२८ चित्रांपैकी परमवीर चक्र प्राप्त हुतात्म्यांच्या चित्रांसह मोजकीच चित्रे आगीत भस्म झालीत. आग विझवण्याचे प्रामाणिक प्रयत्न योग्य वेळेत झाल्याने अनेक पेंटिंग्जपर्यंत आगीची धग पोहोचली नसली तरी ठक यांनी आयुष्यभर पोटाला चिमटा काढून समर्पित भावनेने व देशभक्ती म्हणून उभे केलेले विश्व अवघ्या दीड – दोन तासात भस्म झाल्याने, त्यांची तसेच कलाप्रेमींची अपरिमित हानी झाली आहे. शासनाने अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रकारांची कला जिवंत ठेवण्यासाठी, कलेला उभारी देण्यासाठी सुविधा व सहाय्य उपलब्ध करायला हवे, अशा भावना व्यक्त होत आहे..

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *