कोरोनाशी लढण्‍यासाठी पोंभुर्णा तालुका अद्ययावत आरोग्‍य सुविधांनी सज्‍ज व्‍हावा – आ. सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji Selokar 

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

कोरोना या आजाराने जगामध्‍ये उलथापालथ घडवून आणलेली आहे. अनेक निष्‍पाप नागरिकांना या महामारीत आपला जीव गमवावा लागला आहे. या आजाराशी लढण्‍याकरिता आपण सज्‍ज असले पाहीजे. आजाराशी लढत असताना ज्‍या काही उपाययोजना आपण करीत आहोत, त्‍या शाश्‍वत असणे आवश्‍यक आहे. कोरोना आजाराशी लढताना पोंभुर्णा शहर व तालुका कुठेही मागे पडणार नाही अद्ययावत आरोग्‍य विषयक सुविधांनी शहर व तालुका सज्‍ज व्‍हावा, यात कोणताही हलगर्जीपणा होवू नये याकडे विशेष लक्ष देण्‍याचे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
दिनांक १३ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे पोंभुर्णा तालुक्‍यामधील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला पोंभुर्णा नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी सिध्‍दार्थ मेश्राम, तहसिलदार निलेश खनके, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा माजी जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जि.प. सदस्‍य राहूल संतोषवार, रजिया कुरेशी, सुनीता मरस्‍कोल्‍हे, श्‍वेता वनकर, अमोल मेरगल, सुनिता मॅकलवार, श्री. झगडकर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
पुढील पाच वर्षांचा आरोग्‍य विषयक आराखडा तयार करून पोंभुर्णा शहर व तालुक्‍यात आरोग्‍य विषयक कामे व्‍हावी याकरिता सर्वतोपरी प्रयत्‍न करावे, असे आ. मुनगंटीवार यांनी अधिका-यांना निर्देशित केले. पोंभुर्णा येथे ऑक्‍सीजन प्‍लॅन्‍टची उभारणी करण्‍याबाबत आपण जिल्‍हाधिका-यांशी चर्चा केली असून त्‍यांनी यासंदर्भात मान्‍यता देखील दिलेली आहे यासाठी 1 कोटी १९ लक्ष ८ हजार ६५८ रू. निधी खर्च करण्‍यात येणार आहे. पोंभुर्णा येथे २० ऑक्‍सीजन बेड्स, कोविड केअर सेंटरसाठी १०० गादया व भोजन व्‍यवस्‍था, एक रूग्‍णवाहीका यासाठीच्‍या प्रस्‍तावांना लवकरच मंजूरी मिळणार असून १० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. दोन एमबीबीएस डॉक्‍टर्स व चार स्‍टाफ नर्स उपलब्‍ध होण्‍याबाबत आपण प्रयत्‍नशील असून आपतकालीन व्‍यवस्‍थेसाठी ५०० ते ७०० लीटर डिझेल साठा उपलब्‍ध करून देण्‍यात येत असल्‍याची माहिती आ. मुनगंटीवार यांनी दिली.
कोरोना उपचारादरम्‍यान स्‍टेराईडचा अतिवापर केल्‍यामुळे रूग्‍णांमध्‍ये म्‍युकरमायकॉसिस या आजाराचा प्रादुर्भाव होत असल्‍याचे आढळले आहे. चंद्रपूर जिल्‍हयात सुध्‍दा १० रूग्‍ण आढळल्‍याची माहिती आहे. या आजारावरील उपचारासाठी एका रूग्‍णाला महात्‍मा ज्‍योतीबा फुले जनआरोग्‍य योजनेअंतर्गत १,५०,०००/- रू. खर्च देण्‍याची मागणी आपण सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांच्‍याकडे केली आहे. पुढील ५ वर्षासाठी कोरोनाच्‍या विरोधात लढा देण्‍यासाठी पोंभुर्णा तालुक्‍याची आरोग्‍य विषयक ब्‍लुप्रिंट तयार करून दिर्घकालीन उपाययोजना करण्‍यावर आपला भर असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी पोंभुर्णा तालुक्‍यातील नागरिकांना कोरोना काळात भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन सर्वतोपरी सहकार्य करण्‍यात येईल असे सांगत आ. मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते जनतेची मनोभावे सेवा करतील, अशी ग्‍वाही दिली.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *