सिमेंट कंपन्यांनी कामगारांच्या लसीकरणाची व्यवस्था स्वतःच्या खाजगी दवाखान्यांमध्ये करावी

 

आशिष देरकर यांची मागणी

गडचांदूर – दि 18/4/2021 ÷मोहन भारती 👉औद्योगिक क्षेत्र असल्याने गडचांदूर, नांदाफाटा व उपरवाही या परिसरात बाहेरून ये-जा करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरपना तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अल्ट्राटेक, अंबुजा व माणिकगड सिमेंट कंपन्यांनी आपल्या खासगी दवाखान्यांमध्ये कंपनीत काम करीत असलेल्या कामगारांच्या लसीकरणाची व्यवस्था करावी अशी मागणी राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी आमदार सुभाष धोटे व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली आहे.
कोरपना तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ३० हजाराच्या आसपास असून प्रवाशांची संख्या ७० हजारांपर्यंत आहे. गडचांदूर, नारंडा व कोरपना अशा एकूण ३ ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणासाठी लोकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या असून लसीचा फार मोठा तुटवडा आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून कंपन्यांच्या आदेशानुसार कामगारांनी लसीकरण करण्याकरिता ग्रामीण रुग्णालयांमध्ये गर्दी केली आहे. तसेच कंपन्यांमधील सर्व अधिकारीवर्ग सुद्धा सरकारी दवाखान्यांमध्ये येऊन लसीकरण करून घेत आहे. अशा परिस्थितीत शहरातील दुकानदार, कामगार, फ्रन्टलाइन वर्कर हे सर्व लोक लसीकरण घेत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी वाढलेली आहे.
सिमेंट कंपन्यांकडे स्वतःचे सर्व सोयी-सुविधायुक्त दवाखाने उपलब्ध आहे. त्या दवाखान्यांचा वापर या राष्ट्रीय आपत्तीच्या काळामध्ये योग्य रित्या व्हावा याकरिता कंपन्यांनी स्वतः लसीकरणाची व्यवस्था करावी. लस उपलब्ध होत नसल्यास कंपन्यांकडून सीएसआर निधीचा वापर करून लस खरेदी करून कामगारांना देण्यात यावी. जेणेकरून सरकारी रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यास मदत होईल व कोरोना संक्रमण रोखता येईल. त्याकरिता कंपन्यांना आदेशित करावे असे आशिष देरकर यांनी आमदार व जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

बिबी व खिर्डी येथील उपकेंद्रात लसीकरण सुरू करावे

बिबी व खिर्डी येथे प्राथमिक उपकेंद्र असून या ठिकाणी लसीकरण सुरू केल्यास आजूबाजूच्या जवळपास १५ ते २० हजार लोकसंख्येला त्याचा फायदा होईल. नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु व्हायचे असल्याने सध्या बिबी व खिर्डी येथील उपकेंद्रात लसीकरण सुरू करून ग्रामीण रुग्णालयातील गर्दी कमी करावी अशीही विनंती आशिष देरकर यांनी निवेदनात केली आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *