

दि 11/ 4/2021 मोहन भारती
लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन केल्यास महिनाभरात स्थिती आटोक्यात येऊ शकते. मात्र हा निर्णय एकमतानेच व्हायला हवा, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मांडली. उद्या, रविवारी टास्क फोर्सची बैठक बोलावण्यात आली असून, त्यानंतर दोन दिवसांत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी शनिवार, रविवार कडक वीकेंड लॉकडाऊन केला असला, तरी कोरोनाचा फैलाव थांबताना दिसत नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे.लॉकडाऊनचा निर्णय शुक्रवारीच जाहीर केला असता. केवळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही ऑनलाईन बैठक घेतली आहे. कारण हा निर्णय एकमताने होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
हा लॉकडाऊन आठ दिवसांचा किंवा पंधरा दिवसांचा असू शकतो. हा लॉकडाऊन अत्यंत कडक असेल, असे संकेत देत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले की, कडक निर्बंध आणि थोडी सूट हे आता जमणार नाही. आठ दिवस संपूर्ण कठोर निर्बंध लावून नंतर एकेक गोष्ट पुन्हा सुरू करू. जनतेला थोडी कळ सोसावीच लागेल.
लॉकडाऊनचा फैसला करण्यापूर्वी सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक मुख्यमंत्र्यांनी शनिवारी घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हातावरील शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याने सहभागी झाले नव्हते.
राज्यातील आजच्या स्थितीत लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य देण्यासोबतच वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले तरी ते घेताना हातावर पोट असणार्यांचा विचार करावा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. राज्यात कटू निर्णयाची अंमलबजावणी केली तरच कोरोनाची साखळी तुटेल. गुजरातमधून रेमडेसिवीरचा साठा मिळवण्यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न करावेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायचे असतील तर गरिबांचे नुकसान होणार नाही अशी, व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊन नको आणि सर्व सुरूही नको, यासाठी मध्यबिंदू काढा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.
————————————————–