

घरी राहूनच सण साजरा करा
सोशल डिस्टन्स पाळा
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा
दि 27 / 3 /2021 मोहन भारती
मुंबई/चंद्रपूर/गडचिरोली….गेल्या वर्षी प्रमाणेच होळी, धुलीवंदन व रंगपंचमीच्या सणावर कोविड-19चे सावट असल्याने होळी, धुलीवंदन व रंगपंचमीसाठी घराबाहेर पडू नका, घरातच राहून सण साजरा करा आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले असून नागरिकाना होळी, धुलीवंदन व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
होळी किंवा शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी २८ मार्च २०२१ रोजी होळीचा सण आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. रंगपंचमी हे सण साजरे करताना दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
वडेट्टीवार म्हणाले, यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचनादेखील जाहीर केल्या आहेत. यामध्ये होळीचा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणात जागोजागी होळी पेटवण्यात येत असते. लाकडे जाळणे तसेच यामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाचा विचार करता होळी पेटवण्यात येऊ नये. धूलिवंदनाच्या दिवशी रंगांचा वापर न करता पाण्याचा अपव्यय टाळावा, सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करू नये, असे आवाहन केले आहे.
होळीचा सण आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन येतो. विशेषत: लहान मुले या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. होळीच्या उत्सवाची तयारी अनेक दिवस अगोदरच सुरू होते. परंतु, या वेळी होळी कोरोना काळात साजरी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचेही वडेट्टिवार यांनी सांगितले.
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन युध्द पातळीवर काम करीत असनु त्यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे. कोरोनावर लस आल्यामुळे कोरोनावर लवकरच आपण विजय मिळवू शकू असा विश्वास व्यक्त करत काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या षड्रिपूंवर आपण नियंत्रण मिळवून जीवन सुखी व समृद्ध करण्याचा प्रयत्न करू या. असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
*******************
कोट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन होळी, धूलिवंदन व रंगपंचमी सण साधेपणाने साजरा करा. कोरोनावर लस आल्यामुळे कोरोनावर लवकरच आपण विजय मिळवू शकू.
विजय वडेट्टीवार ,मंत्री
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन , इतर मागास बहुजन कल्याण