गडचांदूरला सुंदर व स्वस्थ शहर बनविणार – आ. सुभाष धोटे

५ कोटी रुपयांची विकासकामे

 दि.27/3/2021 मोहन भारती
कोरपना – राजुरा, कोरपना, जिवती तालुक्याचे गडचांदूर हे एक मध्यवर्ती ठिकाण असून या शहराचा वेगाने विकास होण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने आपण नगरपरिषदेचा दर्जा मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. पुढे गडचांदूरला जिल्ह्यातील सुंदर शहर बनविण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
गडचांदूर येथे आयोजित ५ कोटी रुपयांच्या ७ ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण व बंद नाली बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की गडचांदूर बसस्थानकाचा प्रश्न मोठा आहे. लवकरच बसस्थानकाचा प्रश्न सुद्धा प्रश्न निकाली निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणाचा मुद्दा गंभीर असल्याचे सांगून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर येथील अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सविता टेकाम उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, हंसराज चौधरी, बांधकाम सभापती कल्पना निमजे, गटनेते विक्रम येरणे, सभापती राहुल उमरे, सभापती अर्चना वांढरे, नगरसेवक पापाय्या पोन्नमवार, अरविंद मेश्राम, मीनाक्षी एकरे, अश्विनी कांबळे, शहर महिला अध्यक्ष अर्चना आंबेकर, मुख्याधिकारी विशाखा शेळकी आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन पाणीपुरवठा अभियंता पिदुरकर यांनी केले तर आभार गटनेता विक्रम येरणे यांनी मानले.

अमलनाला सौंदर्यीकरण करण्याकरिता मिळणार साडेचार कोटी
गतवर्षी अमलनाला प्रकल्प सौंदर्यीकरणाकरिता आमदार सुभाष धोटे यांनी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र कोरोनामुळे हा निधी अडकून पडलेला होता. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला होता. मात्र ती योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याने तो निधी प्राप्त होऊ शकला नाही. मात्र नव्याने आमदार सुभाष धोटे यांनी साडेचार कोटी रुपयांचा निधी अमलनाला सौंदर्यीकरण करण्याकरिता मंजूर केला आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.

अग्निशामक वाहनाची होणार उपलब्धता
गडचांदूरला नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त झाल्याला जवळपास ७ वर्षे पूर्ण झाली. मात्र या ठिकाणी अग्निशामक वाहन उपलब्ध नसल्याने सिमेंट कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचारण करून आग विझविण्याचे कार्य पार पाडावे लागत होते. मात्र आता नगरपरिषदेला स्वतंत्र अग्निशामक वाहन आमदार सुभाष धोटे यांनी मंजूर केले असून प्रशासकीय मंजुरी प्रदान झालेली आहे. तसेच अग्निशामक वाहन ठेवण्याकरिता नगरपरिषद परिसरात शेड निर्मितीला सुद्धा मंजुरी प्राप्त झाली आहे.

सिंचन विभागाची जागा मिळणार
आमदार सुभाष धोटे यांच्या सूचनेनुसार गडचांदुरात अमलनाला सिंचन प्रकल्पाची खुली जागा आहे. ७ हेक्टरपैकी जवळपास ४ हेक्टर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. ही जागा हस्तांतरित करण्याचा सुद्धा निर्णय झालेला असून याठिकाणी क्रीडा संकुल, कम्युनिटी हॉल, यासोबतच वेगवेगळ्या इमारती बांधकाम करून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होणार आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *