लोकदर्शन मुंबई 👉: गुरुनाथ तिरपणकर
समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांविषयी सर्वप्रथम अस्वस्थ होणारा घटक म्हणजे वृत्तपत्र लेखक. समाजातील समस्या, घटना आणि वास्तव यांना शब्दरूप देऊन त्या लोकांसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करत असतात. हीच भूमिका ‘जागल्या’ची असल्याचे प्रतिपादन पद्मश्री उदय देशपांडे यांनी केले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मधू शिरोडकर यांच्या ‘कालप्रवाह’ या पुस्तकाचे प्रकाशन दादर येथे पार पडले. नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत आणि माजी संपादक प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उदय देशपांडे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, एखादी घटना पाहिल्यानंतर ती लेखणीद्वारे मांडल्याशिवाय लेखकाला समाधान मिळत नाही. लेख प्रसिद्ध होईल की नाही, याची पर्वा न करता समाजासाठी व्यक्त होण्याची भावना त्यांच्यात असते. मराठी वृत्तपत्र लेखक संघ गेली ७५ वर्षे अशा जागल्या लेखकांना एकत्र आणत सामाजिक चळवळीच्या स्वरूपात कार्यरत आहे, हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत यांनी सांगितले की, वृत्तपत्र लेखक आणि नवशक्ती यांचे दीर्घकाळापासून ऋणानुबंध आहेत. वाचकांकडून सर्वाधिक पत्रे नवशक्तीकडे येतात आणि या नात्याची जपणूक करण्यासाठी त्यांना विशेष प्रसिद्धी दिली जाते. पुढील काळात लेखकांनी अधिक अभ्यासपूर्ण आणि परखड लेखन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
माजी संपादक प्रकाश कुलकर्णी यांनी मधू शिरोडकर यांचे योगदान अधोरेखित करताना वाचकांच्या मतांचे महत्त्व स्पष्ट केले. जागतिक पातळीवरही संपादकीय पानांवर नामवंत व्यक्तींनी मते व्यक्त केली आहेत, याची उदाहरणे त्यांनी दिली.
ज्येष्ठ साहित्यिक अशोक बेंडखळे यांनी संघाच्या इतिहासाचा आढावा घेतला, तर मधू शिरोडकर यांनी ५० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात माजी उपमहापौर अरुण देव, विजय कदम, विश्वनाथ पंडित, नंदकुमार रोपळेकर आणि दत्ताराम घुगे यांनीही मनोगते व्यक्त केली.
संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोहर साळवी यांनी केले.
यावेळी समाजप्रबोधनासाठी निर्भीड लेखन करणाऱ्या वृत्तपत्र लेखकांना ‘निर्भीड जागल्या’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. विविध मान्यवरांच्या हस्ते १७ लेखकांचा सन्मान करण्यात आला. तसेच पत्रस्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विजेत्यांनाही प्रशस्तीपत्र देण्यात आले.
समाजातील मूलभूत प्रश्नांवर सेवाभावी वृत्तीने आणि निर्भीडपणे लेखणी चालवणाऱ्या या लेखकांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.





