मीरा रोड (जि. ठाणे), प्रतिनिधी : डॉ. सौ. शुभांगी गणेश गादेगावकर
वैशाख शुद्ध तृतीयेला येणारा अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘अक्षय्य’ म्हणजे कधीही न संपणारे किंवा नष्ट न होणारे, असा या शब्दाचा अर्थ असून साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची आवश्यकता नसते. केलेले दान, जप, खरेदी आणि धार्मिक कार्य यांचे फळ अक्षय्य राहते, अशी श्रद्धा असल्याने नागरिकांनी सोन्याची खरेदी, नवीन वस्तूंची खरेदी तसेच विविध शुभ कार्यांना सुरुवात केली.
धार्मिक मान्यतेनुसार, पांडवांच्या वनवासकाळात भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला ‘अक्षय्य पात्र’ दिले होते. तसेच महर्षी वेदव्यास यांनी याच दिवशी महाभारत लेखनास प्रारंभ केला होता. भगवान परशुराम यांचा जन्म, गंगा नदीचे पृथ्वीवर अवतरण तसेच नर-नारायण अवतार या दिवशी झाल्याचे मानले जाते.
देशभरात विविध ठिकाणी या सणाला वेगवेगळी नावे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ‘आखा तीज’, तर महाराष्ट्रातील खानदेश भागात ‘आखाजी’ म्हणून हा सण ओळखला जातो.
या निमित्ताने नागरिकांनी सकाळी स्नान करून सूर्य, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली. गोड नैवेद्य अर्पण करण्यात आला. गरजूंना अन्नदान, पक्ष्यांना धान्य देणे तसेच विविध वस्तूंचे दान करण्यात आले.
उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे याच दिवशी उघडले जातात, तर जगन्नाथ रथयात्रेच्या तयारीलाही सुरुवात होते. महाराष्ट्रात हळदीकुंकू समारंभाचा समारोप या दिवशी करण्यात येतो.
अक्षय्य तृतीया हा दिवस पूर्वजांचे स्मरण करण्यासाठीही महत्त्वाचा मानला जातो. पितरांना अर्पण करून त्यांचे आशीर्वाद मिळावेत, अशी भावना व्यक्त केली जाते.
एकूणच, नवीन कार्याची सुरुवात, सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.





