लोकदर्शन गडचांदूर 👉मोहन भारती
गडचांदूर : येथील पोलीस स्टेशन समोरील इडेन कंपनीच्या मेताशा गॅस एजन्सीविरोधात स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे.
या तक्रारींची दखल घेत कोरपना येथील तहसीलदार आणि नायब तहसीलदार भगत यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. चौकशीअंती एजन्सीला पुढील आदेश येईपर्यंत सील काढू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
या पंचनाम्यावेळी गडचांदूर येथील भाजपच्या नगरसेविका व महिला आघाडीच्या अध्यक्षा शीतल धोटे तसेच काँग्रेसचे विवेक येरणे यांनी प्रशासनाला सहकार्य केले.
दरम्यान, एजन्सीवर कारवाई करण्यात आली असली तरी नागरिकांच्या अडचणी मात्र कमी झालेल्या नाहीत. गावातील अनेकांना गॅस सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणावर भटकंती करावी लागत असून, दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.
यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.





