Home
Home गडचांदूर / कोरपणा कोरपना तालुक्यात औद्योगिक क्रांतीचे वारे 🔴३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एमआयडीसी उभारणीला वेग !

कोरपना तालुक्यात औद्योगिक क्रांतीचे वारे 🔴३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एमआयडीसी उभारणीला वेग !

By : Shankar Tadas
कोरपना :

औद्योगिकदृष्ट्या श्रीमंत असूनही गेल्या ३२ वर्षांपासून हक्काच्या एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) वसाहतीपासून वंचित असलेल्या कोरपना तालुक्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांचा खंबीर पुढाकार आणि युवा नेते ओम पवार यांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे या प्रलंबित प्रश्नाला अखेर गती मिळाली आहे. संबंधित विभागांनी तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने तालुक्यातील औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोरपना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) लेखी पत्र पाठवून एमआयडीसी उभारणीसाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. हा सविस्तर अहवाल नागपूर विभागाच्या औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवण्यात येणार आहे. या पत्रव्यवहारामुळे कोरपना तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि स्थानिक उद्योजकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेलंगणा राज्य आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला कोरपना तालुका भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. येथे कच्च्या मालाची उपलब्धता आणि दळणवळणाची साधने मुबलक असूनही अधिकृत औद्योगिक वसाहत नसल्याने मोठ्या कंपन्या येथे गुंतवणूक करण्यास धजावत नव्हत्या. आता एमआयडीसीमुळे मोठ्या प्रकल्पांचे आगमन होईल, ज्यामुळे स्थानिक तरुणांना हाताला काम मिळेल आणि तालुक्याचे अर्थकारण बदलेल.

“कोरपना तालुक्यात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे, मात्र हक्काची एमआयडीसी नसल्याने आमचा तरुण रोजगारासाठी बाहेर जातोय. आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनात आम्ही हा प्रश्न शासन दरबारी लावून धरला होता. आता सर्वेक्षण सुरू झाले असून, लवकरच कोरपना येथे सुसज्ज एमआयडीसी उभी राहील. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील.”
— ओम पवार उपसरपंच धानोली तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here