लोकदर्शन 👉 मोहन भारती
मीरा रोड (जि. ठाणे) – आईचे स्थान जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. मातृत्वातील वेदना, जबाबदाऱ्या आणि त्याग यांचे भावविश्व मांडणारा ‘आईचा संदेश’ हा लेख वाचकांच्या मनाला भिडणारा ठरत आहे. एका स्त्रीसाठी आई होणे ही केवळ शारीरिक प्रक्रिया नसून भावनिक आणि नैतिक जबाबदारीची जाणीव असल्याचे या लेखातून अधोरेखित करण्यात आले आहे.
मूल जन्माला आल्यानंतर आईच्या आयुष्याचे ध्येय बदलते. मुलाला आदर्श व्यक्ती म्हणून घडवणे, त्याला संस्कार देणे आणि समाजात नाव कमावण्यास प्रेरित करणे हे प्रत्येक आईचे स्वप्न असते. मुलांच्या चुका माफ करताना योग्य वेळी शिस्त लावण्याची भूमिकाही आई पार पाडते, असे लेखात नमूद केले आहे.
इतिहासातील माता जिजाऊ, झाशीची राणी आणि देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या मातांचा उल्लेख करत मातृत्वातील त्याग आणि शौर्याचे उदाहरण देण्यात आले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई स्वतःच्या भावना बाजूला ठेवून त्यांना शिक्षण किंवा नोकरीसाठी दूर पाठवते, यामागील तिची अंतर्गत वेदना आणि प्रेमही लेखातून व्यक्त झाले आहे.
लेखाच्या शेवटी आईचा मौलिक संदेश अधोरेखित केला आहे – माणुसकी, प्रामाणिकपणा, संयम आणि ध्येयाच्या दिशेने धैर्याने वाटचाल करण्याचे मूल्य मुलांनी जपावे. समाज, कुटुंब आणि राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा हा संदेश वाचकांना विचार करायला भाग पाडणारा ठरतो.
डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर यांनी साकारलेला हा लेख मातृत्वाच्या भावविश्वाला स्पर्श करणारा असून आईच्या अथांग प्रेमाला सलाम करणारा आहे.





