लोकदर्शन चंद्रपूर👉मोहन भारती
**चंद्रपूर :** चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकीचे नेतृत्व व नियोजनाची धुरा राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हाती देण्यात आली आहे. संघटनात्मक पातळीवर भाजप अधिक सक्षम करणे, तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नियोजनबद्ध, समन्वयित आणि प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली आहे.
या नियुक्तीचा अधिकृत निर्णय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केला असून, त्याबाबतचे नियुक्तीपत्र पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या निर्णयानंतर चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीची आखणी आणि प्रचारयोजनांना वेग आला आहे.
निवडणूक व्यवस्थापनासाठी आमदार चैनसुख संचेती यांची निवडणूक निरीक्षक, माजी खासदार अशोक नेते यांची निवडणूक प्रभारी, तर आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यांच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात सुबक, गतिमान आणि संघटित निवडणूक अभियान उभारण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले आ. सुधीर मुनगंटीवार हे या निवडणुकीत पक्षाचे प्रमुख प्रेरणास्त्रोत ठरणार आहेत. अफाट जनसंपर्क, कार्यकर्त्यांमधील लोकप्रियता आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
महानगरपालिका निवडणूक ही केवळ राजकीय स्पर्धा नसून, चंद्रपूर शहराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासदिशा आणि आराखडा निश्चित करणारी निर्णायक निवडणूक आहे, असा दूरदर्शी दृष्टिकोन त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपचा काही प्रमाणात विस्कळीत झालेला स्थानिक कारभार सुसंघटित करणे, पक्षाला अधिक लोकाभिमुख बनवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे या जबाबदाऱ्या त्यांच्या नेतृत्वाखाली परिणामकारकरित्या पार पडतील, असा विश्वास पक्षात व्यक्त केला जात आहे.





