लोकदर्शन बाखर्डी/कोरपना |👉 प्रतिनिधी : उमेश राजूरकर
कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर कोसळत आहे. परतीच्या पावसाने नुकतेच सोयाबीन व धानाचे हाताशी आलेले पिक हिरावून घेतले. त्यातून सावरत नाही तोच कापसाच्या पिकावर लाल बोंड अळीचा तीव्र प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकरी पूर्णपणे हैराण झाला आहे. या गंभीर स्थितीची दखल घेत बळीराजा शेतकरी परिषद, कोरपना यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली.
यंदा सततच्या असमाधानी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी ओल्या दुष्काळात सापडले. परतीच्या पावसाने तर ऐन काढणीच्या दिवसात मोठे नुकसान घडवून आणले. शासनाकडून मिळालेली तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या वेदनेवर फक्त औपचारिक मलमपट्टी ठरल्याची भावना व्यक्त होत असतानाच आता कापसावर लाल बोंड अळीचा तीव्र प्रादुर्भाव शेतकऱ्यांची चिंता वाढवतो आहे.
शेतकरी तब्बल पाच ते सहा वेळा फवारणी करूनही बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण कोरपना तालुक्यातील हीच परिस्थिती असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्वरीत पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनावर किशोर निब्रड, ज्ञानदीप बेरड, हरिदास गौरकर, साहेबराव घुगुल, यादव निब्रड, श्रीराम पाचभाई, विलास सोयाम, श्यामल विटकर, विनोद नागोसे, प्रभाकर गेडाम, मोहन पावडे, रामदास खेरवटकर यांसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी तेथे उपस्थित होते.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्य या मदतीवर अवलंबून असल्याचे मत स्थानिक शेतकरी व्यक्त करत आहेत.





