लोकदर्शन गडचांदूर👉मोहन भारती
गडचांदूर (16नोव्हेंबर) : आगामी गडचांदूर नगरपरिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी या तीन पक्षांमध्ये अधिकृत युती जाहीर झाली असून, या जाहीरनाम्यामुळे निवडणुकीतील समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ही युती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आयु. प्रकाश तावडे यांच्या अध्यक्षतेखाली १५ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली. गडचांदूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. युती जाहीरनाम्यावर काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरेंच्या गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सह्या असून तीनही पक्षांच्या संयुक्त लढ्याची भूमिका स्पष्ट दिसून आली.
यावेळी प्रा. हिरेश मडावी (पुर्व विद्यानंद समन्वयक), आयु. दिकुमार बोरकर (जिल्हा उपाध्यक्ष), आयु. मधुकर उराडे (जिल्हा महासचिव), आयु. रफीक निंबाळकर (जिल्हा उपाध्यक्ष), आयु. धनराज चांदेकर (कोरपना तालुका सल्लागार) यांच्यासह आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
युती जाहीर झाल्यानंतर गडचांदूर शहरात तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्तांतराचे संकेत देणाऱ्या या भक्कम आघाडीमुळे आगामी नगरपरिषद निवडणूक अत्यंत रोचक होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
जिल्हाध्यक्ष आयु. प्रकाश तावडे यांनी, “गडचांदूरच्या सर्वांगीण विकासासाठी ही युती निर्णायक ठरणार असून, सामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्याचे उद्दिष्ट आमचे आहे,” असे प्रतिपादन केले.
या तिहेरी आघाडीची एन्ट्री म्हणजे नगरपरिषद निवडणुकीत बदलाची चाहूल—असे स्पष्ट संकेत स्थानिक राजकीय वातावरणातून मिळत आहेत.





