लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती
राजुरा (16नोव्हेंबर) : नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच राजुराच्या राजकारणात आज खऱ्या अर्थाने ऊर्जा संचारली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना व आरपीआय समर्थित नगरविकास आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरूणभाऊ धोटे यांनी आज दुपारी २ वाजता तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दणक्यात दाखल करताच परिसर कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने दुमदुमून गेला.
नामांकन दाखल करण्यापूर्वी धोटे यांनी साईनगरातील जगन्नाथ बाबा देवस्थान आणि भवानी माता मंदिर व हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन शुभाशीर्वाद घेतले. धार्मिक वातावरणात सुरू झालेला हा प्रवास पुढे शक्तीप्रदर्शनात रूपांतरित झाला.
नगरविकास आघाडीच्या सर्व १० प्रभागांतील नगरसेवक पदाचे उमेदवार—स्वप्नील मोहुर्ले, मंगला विरुटकर, सिद्धार्थ पथाडे, मंगलाताई मोकळे, ईश्वर उर्फ गोलू ठाकरे, पोर्णिमा सोयाम, सय्यद जहीर, नीता बानकर, भाऊजी कन्नाके, सय्यद फरिना, रमेश नडे, इंदुबाई निकोडे, घनश्याम हिंगणे, पुणम गिरसावळे, दिलीप देरकर, वज्रमाला बतकमवार, संध्या चांदेकर, अनंता ताजने, अन्नु संधू, भारत रोहणे आणि गीता पथाडे—यांनीही अर्ज दाखल करताच आघाडीने निवडणूक रणशिंग जोरदार फुंकले.
या सोहळ्याला माजी आमदार अॅड. वामनराव चटप, माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती विकास देवाळकर, युवा नेते अॅड. दीपक चटप, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर यांसह आघाडीचे सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि समर्थकांची उसळलेली गर्दी यामुळे तहसील कार्यालय परिसर राजकीय मेळाव्याची अनुभूती देत होता. नगरविकास आघाडीचे हे भव्य नामांकन आगामी नगरपरिषद निवडणुकीत आघाडीच्या भक्कम एकजूट व जनसमर्थनाचे स्पष्ट द्योतक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.





