ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित माती व पाणी परीक्षण प्रशिक्षण 

By : प्रवीण मुधोळकर

आनंदवन : महारोगी सेवा समिती, आनंदवन द्वारा संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित आनंद निकेतन कृषि महाविद्यालय, वरोरा येथे भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय कृषि विस्तार व्यवस्थापन संस्था, हैदराबाद (मॅनेज), वसंतराव नाईक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर (वनामती) आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, चंद्रपूर (आत्मा) यांच्या संयुक्त सहकार्याने ग्रामीण युवकांना कौशल्य आधारित ‘ माती व पाणी परीक्षण ‘ या विषयावर ६ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी आनंद निकेतन कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहास पोतदार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणीअधिकारी बी.एस. सलामे प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रशिक्षणांतर्गत युवकांना तज्ञ मार्गदर्शकांमार्फत माती व पाणी परीक्षणाचे महत्त्व, मृदा व सिंचनाच्या पाण्याचा नमुना घेण्याच्या पद्धती, मृदा परिक्षणात सामू, जमिनीची विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुना, उपलब्ध नत्र, उपलब्ध स्फुरद, उपलब्ध पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्य काढण्याचे महत्त्व याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणात जिल्ह्यातील २८ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
समारोपीय कार्यक्रमात आनंदवन कृषि तंत्र निकेतनच्या प्राचार्या एच.एस. पोतदार, वरोरा येथील कृषि अधिकारी मारोती वरभे, प्रशिक्षणाचे मुख्य समन्वयक प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, सह समन्वयक तथा सहा. प्राध्यापक सुशील वाघ याच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here