लोकदर्शन 👉By : Avinash Poinkar
◆८ मार्चला पोंभुर्णा येथे पुरस्कार प्रदान सोहळा
◆राज्यात ग्राम पंचायतीचा पहिलाच अभिनव उपक्रम
पोंभुर्णा (चंद्रपूर) :
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत राज्यात आदर्श ग्राम व जिल्हा स्मार्ट व सुंदर ग्राम पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायत घाटकुळचे राज्य वाङ्मय पुरस्कार २०१९-२० नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यातील साहित्यिकांच्या उत्कृष्ठ साहित्यकृतींना प्रोत्साहन मिळावे व वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या हेतूने राज्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायतीच्या माध्यमाने वाङ्मय स्पर्धा घेण्यात आली. आदर्श ग्राम घाटकुळचे सरपंच सुप्रिम गद्देकार, उपसरपंच शितल पाल, ग्रामसेवक खुशाल मानपल्लीवार, सदस्य विठ्ठल धंदरे, जयपाल दुधे, रजनी हासे, कल्पना शिंदे, रंजना राळेगावकर, प्रकाश राऊत, लता खोबरे यांनी पुरस्कार जाहीर केले.
चंद्रपूरचे कवी डॉ.धनराज खानोरकर यांच्या ‘मास्तर मातीचे’ या कवितासंग्रहास क्रांतीसुर्य बिरसा मुंडा वाङ्मय पुरस्कार, जालनाचे लेखक डॉ.प्रभाकर शेळके यांच्या ‘व्यवस्थेचा बइल’ या कथासंग्रहास राजे हिरशहा आत्राम वाङ्मय पुरस्कार, नागपूरच्या लेखिका मिनल येवले यांच्या ‘एकांताचे कंगोरे’ या ललितलेख संग्रहास राणी दुर्गावती वाङ्मय पुरस्कार, मुंबईचे साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या ‘मिसाईल मॅन’ या बालसाहित्यास राणी हिराई वाङ्मय पुरस्कार, अमरावतीचे लेखक प्रमोद चोबितकर यांच्या ‘भणंग’ या कादंबरीस क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके वाङ्मय पुरस्कार, इचलकरंजीचे लेखक अशोक जाधव यांच्या ‘भंगार’ या आत्मकथनास राजे खांडक्या बल्लाळशहा वाङ्मय पुरस्कार घोषित करण्यात आले.
रोख दोन हजार रुपये, शाल, श्रीफळ, मानपत्र पुरस्काराचे स्वरुप असून ८ मार्च रोजी महिला दिनानिमीत्त आयोजित पंचायत समीती पोंभुर्णा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, पंचायत समीती सभापती अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, पं.स.सदस्य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, प्रसिद्ध साहित्यिक श्रीपाद प्रभाकर जोशी, डॉ.पद्मरेखा धनकर, अविनाश पोईनकर, नरेशकुमार बोरीकर यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येईल. असे ग्रा.पं.घाटकुळ तर्फे कळवण्यात आले आहे. उपक्रमाचे आयोजन व नियोजनासाठी गावातील जनहित युवा मंडळ, मराठा युवक मंडळ, महिला ग्रामसंघ, बालपंचायत व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.
••••••